बोदवड ते चिखली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

0

बोदवड। बोदवड ते चिखली हा रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेतून पूर्ण झाला असून सुनिल हॉटेल ते साखळी क्रमांक 300 पर्यंतच्या रस्त्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे झालेले नसून बोगस व निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. या बोगस कामाची चौकशीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल खंडेलवाल यांनी तहसिल कार्यालयासमोर वडजी, चिखली, हरणखेड, चिंचखेडे येथील ग्रामस्थांसह लाक्षणिक उपोषण केले.

रस्त्याच्या कामात अनियमितता
बोदवड – चिखली ते वडजी रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ठेकेदाराने पूर्ण केले असून सुरुवातीच्या बोदवड सुनिल हॉटेलपासून ते साखळी क्रमांक 300 पर्यंतचे काम प्रकल्पपत्रानुसार केलेले दिसून येत नाही. ठेकेदाराने रस्त्याचे काम अद्याप अपुर्ण ठेवले आहे. काम बोगस व निकृष्ठ दर्जाचे आहे. साखळी क्रमांक 300 पर्यंतच्या कामाबाबत अनिल खंडेलवाल यांनी कार्यकारी अभियंत्यांना 12 जुलै 2015 ते 30 डिसेंबर 2016 व 5 जानेवारी 2017 रोजी असे तीन वेळा पत्र पाठवून संबंधितांनी दखल घेतलेली नाही. नागरिकांनी सुध्दा तक्रारी केल्या आहेत. परंतु तक्रारींना केराची टोपली दाखविल्यामुळे नगरसेवक अनिल खंडेलवाल यांनी उपोषण केले. उपोषणास उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण, कैलास चौधरी, सईद बागवान, दिनेश माळी, आनंदा पाटील, देवेंद्र खेवलकर, मधुकर राणे, दिलीप घुले, किरण वंजारी, भागवत टिकारे यांनी पाठींबा दिला.