उपनगराध्यक्षपदी दिनेश माळी यांना संधी ; नूतन पदाधिकार्यांचा सत्कार
बोदवड- नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या मुमताज बी.बागवान यांच्या दुसर्यांदा फेरनिवड झाली असून उपनगराध्यक्षपदी दिनेश माळी यांची वर्णी लागली आहे. शुक्रवारी नगराध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रभारी तहसीलदार मुक्ताईनगरचे पीठासीन अधिकारी श्याम वाडेकर व मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्ष पद ओबीसी महिला आरक्षित असल्याने भाजपतर्फे दुसर्यांदा मुमताजबी सईद बागवान संधी देण्यात आली तर त्या दहा मते मिळवून दुसर्यांदा नगराध्यक्षपदी वर्णी लागली. राष्ट्रवादीच्या वंदना विजय पालवे यांना अवघी सहा मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. उपनगराध्यक्षपदासाठी भाजपाचे नगरसेवक दिनेश माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दुसर्यांदा बागवान यांना मिळाली संधी
अडीच वर्षाआधी बोदवड नगरपंचायतीत 17 निवडून आलेल्या सदस्यांमध्ये भजपचे सात तर राष्ट्रवादीचे चार, काँग्रेस दोन व शिवसेना एक, अपक्ष तीन असे बलाबल होते. त्यावेळी भाजपने शिवसेनेचा एक बंडखोर नगरसेवक व एका अपक्ष नगरसेवकाच्या सहाय्याने सत्ता मिळवली होती. शिवसेनेचे बंडखोर नितीन चौहान यांना उपनगराध्यक्ष पद देण्यात आले होते. त्यावेळेस मुमताज बी. सईद बागवान या नऊ मते मिळून विजयी झाल्या होत्या तर राष्ट्रवादीचे दीपक झांबड यांना राष्ट्रवादीच्या चार, दोन अपक्ष व दोन काँग्रेसच्या दोन सदस्यांनी मतदान केले होते व अवघ्या एका मताने त्यांचा निसटता पराभव झाला होता. यावेळी अपक्ष नगरसेवक आफ्रिन बी.बागवान यांनी भाजपला मतदान करून भाजपाचे संख्याबळ दहा केले तर काँग्रेसच्या आसम बी.शे.इरफान या मतदान प्रक्रियेसाठी गैरहजर राहिल्या. परीणामी मुमताज बी.सईद बागवान यांची दुसर्यांदा नगराध्यक्ष पदावर वर्णी लागली. दरम्यान, नूतन पदाधिकार्यांचा शासकीय विश्रामगृहावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.