बोदवड- पालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी गटाने अवघ्या पाच मिनिटात 15 विषयांना मंजुरी दिली. त्यात पालिका कर्मचार्यांना किमान वेतन देणे आदी विषयांचा समावेश आहे. विरोधी गटाने मात्र या सभेवर बहिष्कार टाकला. सोमवारी सकाळी 11 वाजता या सभेला सुरुवात झाली. नगराध्यक्ष मुमताजबी बागवान अध्यक्षस्थानी होत्या. तत्पूर्वी, विरोधी गटातील सर्व नगरसेवकांनी गैरहजर राहून सभेवर बहिष्कार टाकला. मात्र, सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवकांनी सभेच्या कामकाजात सहभाग घेत अवघ्या 5 मिनिटात 15 विषयांना मंजुरी दिली. त्यात बायोमेट्रिक मशिन खरेदी, सर्व कर्मचार्यांना शासन नियमानुसार किमान वेतन लागू करणे, नगरपंचायत कार्यालय व शहरात इतर ठिकाणी रंगकाम आणि इलेक्ट्रिक फिटींगसाठी निविदा काढणे, स्वच्छ सर्वेक्षण 2019 समोर ठेवून जास्त गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, सफाई कामगारांना शासन निर्णयानुसार सोईसुविधा पुरवणे, स्वच्छता अभियानावर होणार्या खर्चास मंजुरी, घनकचरा व्यवस्थापनातून कंपोस्टिंग प्रक्रिया, शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती, नवीन कर आकारणीस व येणारा खर्च, कार्यालयात दररोजचा पाणीपुरवठ्याचा खर्च, सार्वजनिक शौचालयास नवीन नळ कनेक्शन व विद्युतीकरण या विषयांचा समावेश आहे. उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण, गटनेते कैलास चौधरी, कैलास माळी, दिनेश माळी, अकबर बेग, रूपाली राणे, रेखाबाई गायकवाड, सकीनाबी कुरेशी हजर होते.
म्हणून टाकला बहिष्कार
सभेवर बहिष्काराच्या भूमिकेचे समर्थन करताना विरोधी गटनेते देवेंद्र खेवलकर म्हणाले की, मागील मिटिंग होवून तीन महिने झाले मात्र तरीही शहरातील प्रश्न सुटलेले नाहीत. पालिकेत भाजपची सत्ता येऊन दोन वर्षे झाली. तरीदेखील ऐन पावसाळ्यात शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. रस्ते, दिवाबत्ती, स्वच्छतेचा बोजावरा उडाला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असून पदे रिक्त आहेत. याचा निषेध म्हणून बहिष्कार टाकल्याचे सांगितले.