बोदवड- बोदवड येथीलल प्रभाग क्रमांक आठमधील उर्दू कन्या शाळेत सोमवारी रात्री 9 ते सकाळी सहाच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शाळेतील वर्ग खोल्यांचे कुलूप तोडुन वर्गातील पंखे, पुस्तके , व महत्वाची कागदपत्रे इत्यादी साहित्य चोरली तसेच अन्य साहित्याची नासधूस केली. या प्रकरणी मात्र पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची तक्रार देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील उर्दू कन्या शाळेची संरक्षण भिंत तोडून अज्ञातांनी शाळेत प्रवेश केला. यावेळी अज्ञातांनी शाळेतील बेंच, खिडक्या, लोखंडी ध्वजस्तंभ, स्वच्छतागृहांचे दरवाजे व शैक्षणिक साहित्याचे नुकसान करून इमारतीची नासधूस केली. हा प्रकार सोमवारी रात्री 9 ते सकाळी 6 च्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी वरीष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येईल, असे शाळेचे मुख्याध्यापक सैय्यद इकबाल सैय्यद फयाज्जोद्दीन यांनी सांगितले.
उपद्रवींचा वाढतोय त्रास
अज्ञात व्यक्ती शाळेच्या आवारात प्रवेश करून शाळेच्या भिंतीवर अश्लिल मजकूर लिहणे, अस्वच्छता निर्माण करणे, शाळेच्या ओट्यावर जुगार खेळणे अशा प्रकारचे उपद्रव करून शाळेच्या प्रशासनाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करीत असल्याने शालेय प्रशासन मेटाकुटीस आले आहे.
शाळेत 376 विद्यार्थिनी
उर्दू कन्या शाळेत पहिली ते सातवीत एकूण 376 विद्यार्थीनी शिक्षण घेतात. एक मुख्याध्यापक व आठ शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे देत आहेत मात्र असे असूनही उपद्रवींकडून त्रास दिला जात असल्याने शिक्षण विभाग व पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.