बोदवड येथे प्रेमीयुगलाचा विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

0

दोघांची प्रकृती चिंताजनक ः जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु

जळगाव– नेहमीप्रमाणे मुलगी महाविद्यालयात परिक्षा असल्याने घराबाहेर पडली, याचदरम्यान ठरल्याप्रमाणे तिचा गावातीच प्रियकर असलेला तरुण तिच्या संपर्कात होता. 17 वर्षाची मुलगी व 20 वर्षीय मुलगा या प्रेमीयुगलाने बोदवड शहरातील नयनतारा मार्केट पसिरात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. दोघांवर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागा उपचार सुरु असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान दोघांच्या आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कारण कळू शकलेले नाही.

दोघांनी सोबत केले विषप्राशन

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील कुर्‍हा हरदो येथील बारावीत शिकणारी 17 वर्षीय संगिता (नाव बदललेले) आणि गावातीलच समाधान (नाव बदललेले) वय – 20 यांनी दोघांनी बाजारातील नयन तारा पार्क येथे विषारी औषाध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दोघांनी विष घेतले आहे हे गल्लीतील एका नागरीकाच्या लक्षात आल्याने त्यांनी संगिताला ओळखले. त्यांनी थेट संगिताच्या वडीलांना मोबाईलने संपर्क करून घटनेची माहिती दिली. मुलीच्या वडीलांनी घटनास्थळी धाव घेवून दोघांना तातडीने खासगी वाहनाने बोदवड ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचारादरम्यान प्रकृती गंभीर असल्याने दोघांना जळगाव येथील जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दोघांवर उपचार सुरु आहेत.

प्रेमप्रकरणापासून कुटुंबिय अनभिज्ञ

संगिताला चार बहिणी आणि आईवडील असून बोदवड येथील महाविद्यालयात संगिता 11 वीला शिकत आहे. त्यामुळे दररोज कुर्‍हा हरदो ते बोदवड असा बसने प्रवास करते. महाविद्यालयात जाण्यासाठी नेहमीप्रमाणे संगीता सकाळी 5.45 ला घरातून निघाली होती तर समाधान हा गावात मिळेत ते काम करून आपला उदरनिर्वाह करतो. त्याचे वडील लहानपणीच निधन झाल्याने घरी आई एकटीच असते. दोघांचे गेल्या वर्षभरापासून प्रेमाचे सुत जुळले होते. मात्र याबाबत दोघांच्याही घरी कुणालाच माहिती नव्हते. आज दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर दोघांच्या कुटुंबियांना प्रेमप्रकरणाबाबत कळाल्याचेही समोर आले आहे. नेमके दोघांची प्रकृती चिंताजनक असून दोघांना कृत्रिम श्वासोच्छवासाचे मशीन लावण्यात आले असून जिल्हा रुग्णालयात दोघांवर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळाल्यावर दोघांकडील नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.