बोदवड। शहरात ट्रॅक्टरवर काम करणार्या एका मजुराचा मृतदेह डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या दुकानामागील परिसरात शुक्रवार 28 रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याच्या डोक्याला व डोळ्याला मार लागल्याच्या खुणा दिसत असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपाळ तुकाराम माळी (वय 52) हे ट्रॅक्टरवर मजुरीचे काम करीत असत मात्र शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मेन रोडलगत राज रेडीओ या दुकानाच्या मागे मृत अवस्थेत शुक्रवार 28 रोजी सकाळी 6.30 वाजेपुर्वी आढळून आला. त्याच्या डोक्याला व डोळ्याला मार लागल्याच्या खुणा दिसत होत्या. गजानन नामदेव माळी यांच्या खबरीवरुन पोलीस स्थानकात अकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिध्दार्थ खर करीत आहे.
घातपाताची शक्यता : या घटनेचे वृत्त समजताच नागरिकांची एकच गर्दी केली होती. गोपाळ माळी याचा घातपात करण्यात आला की काय याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून यासाठी या गुन्हा घडण्याचे प्रमुख कारण त्यांच्या घरगुती किंवा इतर वादामुळे तर त्याचा कोणी घात केला तर नाही, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अमिर यांनी घटनास्थळाची पाहणी करुन बोदवडला बराच वेळ थांबून होते. या घटनेचा तपास सुरु असून आरोपीला लवकर जेरबंद केले जाईल, असे पोलीस निरीक्षक सिध्दार्थ खरे यांनी सांगितले.