बोदवड रुग्णालयातील अधिपरीचारीकेला मारहाण ; दोघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा

0

रुग्ण सेवेअभावी रुग्णांचे हाल ; कायमस्वरुपी डॉक्टरांची मागणी

बोदवड- तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालयात महिनाभरापासून डॉक्टरांअभावी रुग्णसेवा कोलमडली आहे. 20 रोजी सायंकाळी सात वाजता गावातील दोघा संशयीतांनी अधिपारीचारीकेसह त्यांच्या मुलाशी हुज्जत घालून मारहाण केल्याने या प्रकाराचा रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी निषेध करीत बोदवड पोलिसांना निवेदन दिले. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात दोघांविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिपरीचारिका माया मारोती तायडे यांनी या प्रकरणी बोदवड पोलिसात फिर्याद दिली.

डॉक्टरांअभावी रुग्णांचे हाल
ग्रामीण रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून डॉक्टर नसल्याने ऐन दुष्काळात सामान्य नागरीकांवर उपचाराविना राहण्याची वेळ आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून मुक्ताईनगर येथील डॉ.योगेश राणे हे ओपीडीसाठी येत आहेत तर कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने रुग्णांना आल्या पावली परत फिरावे लागत आहे. याचाच फटका कर्तव्यावर असलेल्या अधिपरीचारिका माया तायडे व त्यांचा मुलगा सुगत तेलगोटे यांना दोन दिवसांपूर्वी बसला. बोदवडमधील भिलवाडी परीसरातील दोघांनी एका रुग्णास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले व उपचारासाठी डॉक्टरांना बोलविण्यासाठी हुज्जत घातली. अधिपरीचारीा यांनी पेशंटवर प्राथमिक उपचार केले व डॉक्टर नसल्याचे सांगितले मात्र अज्ञात आरोपींनी डॉक्टर उपलब्ध करुन देण्यासाठी तायडे यांच्या सोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली तसेच भांडण सोडविण्यासाठी गेलेला तायडे यांचा मुलगा सुगत तेलगोटे याला मारहाण केली. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.