बोदवड शहरासह तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई

0

पाणीटंचाई पाणी विक्री करणार्‍यांच्या पथ्थ्यावर ; टँकरसह जारच्या पाण्याला मागणी वाढली ; लोकप्रतिनिधींकडून मोठ्या अपेक्षा

बोदवड- शहरात 15 दिवसाआठ तर ग्रामीण भागात 20 ते 25 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांचे अतोनात हाल होत आहेत. नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून प्रसंगी रोजगारालाही मुकावे लागत आहे. ही बाब पाणी विक्री करणार्‍यांच्या पथ्थ्यावर पडली असून पाच हजार लिटर पाण्याचा टँकर 500 रुपयांना तर जारचे पाणी 20 प्रमाणे सर्रास विकली जात आहे. तालुक्यात सहा ते सात जारचे पाणी विक्री करणार्‍या कंपन्या असून त्यांच्याकडून प्रतिदीन सुमारे 400 वर जार विकले जात आहे. या माध्यमातून दररोज एक लाख लिटर पाण्याची विक्री केली जात आहे. नगरपंचायतीने ग्रामस्थांचे होणारे हाल पाहता विहिर व बोअरवेल अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्याची अपेक्षा आहे.

जलदूतांचे काम गौरवास्पद
ग्रामीण भागासह शहरात स्वखर्चाने प्रभू अँग्रो कंपनीकडून आपल्या टँकर व ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करून जनतेची तहान भागवली जात आहे. तालुक्यात मागील पाच ते सहा वर्षांपासुन दुष्काळ असल्याने तसेच तालुक्यात कोणत्याही प्रकारचे नदी, तलाव, धरण वा इतर जिवंत पाण्याचा स्त्रोत नसल्याने या तालुक्यात उन्हाळ्यात नागरीकांचे चांगलेच हाल होत आहेत. तालुक्यातील 33 गावांचा पाणीपुरवठा हा ओ.डी.ए. योजनेवर अवलंबून आहे. ही योजना कालबाह्य असल्याने या जलवाहिनीत नेहमीच लिकेजसह बिघाडाची डोकेदुखी होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने ओ.डी.ए.ची नुतनीकरण जलवाहिनी टाकली जात असून मुक्ताईनगरपासुन ही या जलवाहिनीची नाडगावपर्यंत काम झाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर पुढील काम होणार आहे,

स्वतंत्र जलवाहिनीचे काम रेंगाळले
शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा जलवाहिनीची आवश्यकता असून तसा ठराव नगरपंचायतीने केला आहे. जिल्हा जीवन प्राधिकरणकडून परवानगी सुध्दा मिळाली आहे मात्र नाशिक विभाग जीवन प्राधिकरणाकडे काम रेंगाळले असल्याचे समजते. प्रत्यक्षात कामकाजाला केव्हा सुरुवात होईल? याची शहरवासीयांना प्रतीक्षा आहे. ग्रामीण निकषानुसारच शहरवासीयांना माणसी 40 लिटर प्रमाणेच पाणीपुरवठा होत आहे. आजच्या परिस्थितीत शहरात पाणीपुरवठ्याला 17 दिवस झाले असून नाडगावजवळ एअर व्हॉल्व्ह नादुरुस्त झाला असल्याने हजारो लिटर पाणी वाया गेल्याने आणखी चार दिवस पाणीपुरवठा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

जामठी गावातही टंचाईच्या झळा
तालुक्यातील जामठी येथेही गेल्या काही दिवसांपासून ओडिऐ योजनेंतर्गत पाणीपुरवठा न झाल्याने गावास ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीला तीव्र पाणीटंचाईचे चटके जाणवत आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी गावास पाणीपुरवठा झाल्याने व उन्हाळा असल्याने पाण्याची नितांत गरज भासत असताना घरातील पाणी साठादेखील संपलयान ग्रामस्थांना विकतच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत असून शेत-शिवारातून पाणी आणताना त्यांची दमछाक होत आहे. काही दिवसांपूर्वी ओडिएची जल वाहिनी फुटल्याने तालुक्यासह इतर गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. काही गावांमधे पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. जामठी गावास मुख्य तीन स्त्रोतामधुन पाणीपुरवठा करण्यात येतो त्यात मुख्यतः ओडिए योजनेंतर्गत निम्म्याच्यावर गावास पाणीपुरवठा होतो व उर्वरीत गावास ऐतिहासिक पॉवर हाऊसिंग योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येतो व ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने गावानजिक शेतामध्ये करण्यात आलेल्या बोरवेल मधुन पाणीपुरवठा होतो मात्र पॉवर हाऊसिंग योजना व बोरवेलला पुरेसा जलसाठा नसल्याने गावास पाणीटंचाई सामना करावा लागत आहे.