बोदवड शहर व परिसरात अवैध दारुसह गुटख्याची सर्रास विक्री

0

बोदवड । राज्य शासनाकडून गुटखा विक्रीला दारुबंदी घालण्यात आली आहे. तरीसुध्दा बोदवड शहरासह ग्रामीण भागात गुटख्याची व दारुची सर्रास विक्री होत आहे. बोदवड शहरात व्यापारी संकुल, किराणा दुकान, पान टपर्‍यांमध्ये सर्रास विक्री केली जात आहे. ग्रामीण भागात मोटारसायकलींद्वारे दारु व गुटख्याचा सर्रास पुरवठा केला जातो. पुरवठादारांना फक्त एक मिस्ड कॉल केला की अर्ध्या तासात अवैध देशी दारुचे खोके पुरवठा केला जातो. नुकताच महिलांनी कुर्‍हा हरदो येथे देशी, विदेशी दारुचा अवैध साठा पोलिसांच्या ताब्यात दिला.

शिवसेनेच्या तक्रारीनंतरही कारवाई होईना
यापुर्वी जलचक्र बु.च्या, सुरवाडा बु., लोणवाडीच्या, शेलवडच्या, जलचक्र खुर्द, चिखली बु.च्या महिलांनी बोदवड पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिले होते. परंतु तात्पुरती कारवाईचे सोंग करुन पुन्हा अवैध देशी दारु जोरात विक्री सुरु आहे. तसेच तालुक्यातील अवैध दारु विक्रीसंदर्भात शिवसेनेचे राहुल अग्रवाल, गजानन खोडके, दिपक माळी यांनीसुध्दा जिल्हा पोलीस अधिक्षकांना तक्रार अर्ज दिला होता. परंतु दारु काही बंद होण्याचे नाव घेत नाही.

दत्त कॉलनीत झाली होती कारवाई
अवैध देशी दारुला आणखी एक अवैध धंद्याची जोड मिळाली आहे. बोदवडमध्ये सर्वप्रथम अवैध गुटखा दत्त कॉलनीत एका व्यक्तिच्या घरात अन्न सुरक्षा अधिकारी व पोलिसांनी 16 जून 2014 रोजी 65 हजार 700 रुपयांचा गुटखा जप्त केला होता. तेव्हापासून बोदवडमध्ये एकही अवैध गुटखा विक्रेत्यावर कारवाई केलेली दिसून येत नाही.

तीव्र संताप
बोदवडमध्ये कामगार वर्गापासून ते नोकरवर्गासह त्यात पोलीस, आरोग्य कर्मचारी, महसुलचे कर्मचारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, कृषी विभागाचे कर्मचारी जवळपास सर्व कर्मचारी कार्यालयात गुटखा खावून भिंती, खिडक्या, इमारतीचे जिने रंगविलेले दिसतात. शौचालय, मुतारीत गुटख्याच्या खाली पाऊच सर्रास दिसून येतात. हे सर्व खुलेआम सुरु असून अन्न सुरक्षा अधिकारी, पोलीस अधिकारी डोळेझाक करीत आहे. अवैध देशी दारु विक्रीकडे उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष आहे. या सर्व अवैध धंद्यांवर आळा बसावा, अशी जनतेची मागणी आहे.