बोधचिन्हावरून लोकमान्यांची प्रतिमा हटविली!

0

पुणे : ‘गणेशोत्सवाचे जनक कोण? लोकमान्य टिळक की भाऊसाहेब रंगारी?’ असा सवाल पुणेकरांना पडला होता. कारण, पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने टिळकांना श्रेय देण्यास ऐतिहासिक पुरावे व संदर्भ देत तीव्र विरोधक केला होता. त्यावरून पुणे महापालिका व भाऊसाहेब रंगारी मंडळ यांच्यात तीव्र वादही निर्माण झाला होता. तसेच, गणेशोत्सवाचे ही 125 नव्हे तर 126 वे वर्ष असल्याचेही मंडळाचे म्हणणे होते. या वादात अखेर महापालिकेने नमती भूमिका घेतली असून, शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त जारी करण्यात आलेल्या बोधचिन्हा (लोगो)वरून लोकमान्य टिळकांची प्रतिमा हटविली आहे. शनिवारी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते या बोधचिन्हाचे अनावरण केले जाणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या या निर्णयावरून पुण्यात पुन्हा एकदा नवा वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

वाद टाळण्यासाठी निर्णय; दाव्यावर ठाम : महापौर
पुणे महापालिका आणि राज्य सरकारकडून यंदा गणेशोत्सवाचे 125 वे वर्ष साजरे करण्यात येणार आहे. मात्र, यावर पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आक्षेप घेतला होता. यावरून गेल्या काही दिवसांपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ आणि पुणे महानगरपालिकेत वाद सुरू होता. अखेर या वादात पुणे महापालिकेने नमते धोरण स्वीकारले. गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त पालिकेतर्फे विशेष बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यात आले होते. या लोगोवर सुरूवातीला लोकमान्य टिळकांचे चित्र होते. मात्र, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने टिळकांचे चित्र बोधचिन्हावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात येणार होते. महापौर आणि लोकमान्य टिळकांचे वंशज असलेल्या मुक्ता टिळक आणि शैलेश टिळक यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गणेशोत्सव सुरू करण्यात लोकमान्य टिळकांचे मोठे योगदान होते. हा एकप्रकारे त्यांच्या योगदानाचा उत्सव होता. त्यामुळे हा निर्णय घेताना खूप वाईट वाटत आहे. मात्र, गणेशोत्सव शांततेने पार पडावा, यासाठी हा निर्णय घेणे गरजेचे होते. परंतु, लोकमान्यांनीच गणेशोत्सव सुरू केला या दाव्यावर आम्ही ठाम आहोत, असे मुक्ता टिळक यांनी सांगितले.

रंगारी मंडळाने दिला आंदोलनाचा इशारा
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असून, महापालिका आणि सरकारकडून चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा दावा मंडळाकडून करण्यात आला होता. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी पुण्यातील गणेशोत्सवाला 1882 पासून सुरुवात केली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. मात्र, आजवर झालेल्या उत्सवात त्यांच्या नावाचा उल्लेखदेखील केला जात नाही. सुरूवातीच्या काळात तीन गणपती बसवले जात होते. त्यानंतर मानाच्या गणपतीचा उत्सव साजरा केला गेला. याच्या सर्व नोंदी इतिहासात पाहायला मिळतात. मात्र, सरकारकडून खर्‍या इतिहासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या पुढील काळात महापालिकेने याची दखल घ्यावी. तसेच त्यांच्या नावाने हा उत्सव साजरा केला पाहिजे. तसेच यंदाचे वर्ष हे गणेशोत्वाचे 126 वे वर्ष असल्याचे त्यांनी म्हटले होते. याबाबत महापौर आणि राज्य सरकारकडे गतवर्षापासून पाठपुरावा करण्यात आला. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शनिवारी सकाळी टिळक पुतळ्याजवळ आंदोलन करण्याचा इशारा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाने दिला आहे.