‘बोनस वसुली’मुळे नाराजी

0

मुंबई । दिवाळीसाठी ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांना मिळालेला 5500 रुपयांचा बोनस ‘बेस्ट’ प्रशासनाने पगारातून कापण्यास सुरुवात केल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घ्या, अन्यथा पुन्हा आंदोलन करू असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांनी आंदोलन केल्यानंतर शिवसेनेच्या यशस्वी मध्यस्थीमुळे 45 हजार ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांना 5500 रुपयांचा बोनस देण्यात आला होता. यासाठी पालिकेकडून ‘बेस्ट’ला 21 कोटी 46 लाख रुपयांचे अनुदान मिळाले. मात्र आता ‘बेस्ट’ प्रशासनाने कराराचे कारण देत दिलेला बोनस पगारातून कापण्यास सुरुवातही केली आहे. यामध्ये जानेवारीच्या पहिल्या महिन्यातच 500 रुपये कापून घेण्यात आले आहेत. उर्वरित पाच हजार पाचशेच्या समान हप्त्यांमध्ये दरमहा कापून घेणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

कामगार संघटना न्यायालयात जाणार
आर्थिक डबघाईतून जाणार्या ‘बेस्ट’ वाचवण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अनेक सुधारणा सुचवल्या आहेत. यामधील तब्बल 80 टक्के सुधारणा ‘बेस्ट’ समितीने स्वीकारल्या आहेत. यातील अनेक सुधारणांमुळे ‘बेस्ट’ आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास सुरुवातही झाली आहे. असे असताना आयुक्तांनी पगारातून बोनस कापण्यास दिलेली मंजुरी म्हणजे मनमानी असल्याचे ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सांगितले. सणासुदीसाठी बोनसच्या रूपात दिलेले अनुदान पुन्हा पगारातून कापून घेण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. ही कामगारविरोधी भूमिका कधीही खपवून घेणार नाही. हा निर्णय मागे घेतला नाही तर न्यायालयात जाणार असून आयुक्तांच्या मनमानीविरोधात आंदोलनही करणार असल्याचेही ‘बेस्ट’ वर्कस युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले.

आयुक्तांनी सुचवलेल्या सुधारणा अमलात आणल्या असताना पुन्हा पगारातून बोनस कापण्याचा निर्णय हा अन्यायकारक आहे. आयुक्तांनी दिलेले वचन मोडून फसवणूक केल्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे ताबडतोप ‘बोनस कटिंग’ थांबवा आणि कापलेली रक्कम पुढच्या पगारातून परत करा, अन्यथा जोरदार आंदोलन करण्यात येईल.
– सुहास सामंत, अध्यक्ष, बेस्ट कामगार सेना