बोपखेलच्या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यामध्ये पर्रीकर यांचा सिंहाचा वाटा

0

शहर भाजपकडून दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा

पिंपरी चिंचवड ः दिवंगत मनोहर पर्रीकर हे सर्वसामान्यांना सहज उपलब्ध असणारे नेते होते. ते कायम सामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत. त्यांची पक्षासाठी समर्पित केलेली निष्ठा होती. त्यामुळेच गोव्यात भाजप पक्ष वाढला. पर्रीकर हे संरक्षणमंत्री असताना पुण्यातील लष्कराशी संबंधित अनेक प्रश्‍न कौशल्यपूर्णरित्या सोडविले. त्यांच्या वागण्यातील साधेपणा त्यांनी शेवटपर्यंत जपला, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांना मंगळवारी (दि. 19) श्रद्धांजली वाहण्यात आली. खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेनेच्या उपनेत्या व आमदार डॉ. निलम गोर्‍हे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिवंगत पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. कर्तव्यदक्ष, देशाभिमानी आणि सुसंस्कृत नेता हरपल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती…
दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे रविवारी (दि. 17) निधन झाले. पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, शिवसेनेच्या आमदार डॉ. निलम गोर्‍हे, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, संघटनमंत्री रवि अनासपुरे, महापौर राहुल जाधव, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उमा खापरे, अमित गोरखे, शैला मोळक यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

देशाचे मोठे नुकसान…
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, दिवंगत मनोहर पर्रीकर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंवडमध्ये भाजप प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांची कार्यपद्धती आणि त्यांच्यातील साधेपणा आम्हाला अनुभवता आला. शहरातील झोपडपट्टी भागात जाऊन त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे सामान्यांना सांगितली. लष्कराशी संबंधित असलेले पिंपरी-चिंचवडमधील अनेक प्रश्‍न त्यांच्यामुळेच मार्गी लागले. बोपखेलच्या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यामध्ये पर्रीकर यांचा सिंहाचा वाटा होता. ते कर्तव्यदक्ष आणि देशाभिमानी होते. त्यांच्यासारखा नेता हरपल्याने देशाचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.