बोपखेलसाठी पालिका संरक्षण विभागाला २५ कोटी देणार

0

पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा देण्यास संरक्षण खात्याने सहमती दर्शिवली आहे. त्या जागेची किंमत म्हणून पालिका संरक्षण विभागाला २५ कोटी रुपये देणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेची मे महिन्याची तहकूब सभा आज शुक्रवारी आयोजित केली आहे. महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ता बंद

बोपखेलमधून दापोडी आणि खडकीला जाण्यासाठी सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा वापर केला जात होता. त्यामुळे बोपखेलमधील ग्रामस्थांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाणे सोईचे ठरत होते. मात्र, उच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिलेल्या निकालानंतर लष्कराने २०१५ मध्ये सीएमईच्या हद्दीतील रस्ता बंद केला. हा रस्ता पूर्ववत सुरू करावा. यासाठी बोपखेलकरांनी आतापर्यंत अनेक आंदोलने केली. त्याला लष्कराने कोणतीही दाद न देता सीएमईच्या हद्दीतून जाणारा रस्ता कायमचाच बंद करून टाकला. तसेच बोपखेलवासीयांची गैरसोय दूरकरण्यासाठी मुळा नदीवर बोपखेलते खडकीला जोडणारा तात्पुरता तरंगता पूल सुरू केला. मात्र, तो तात्पुरता तरंगता पूल तात्पुरताच ठरला. त्यामुळे बोपखेलवासीयांना सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जाण्यासाठी 10 ते 15 किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे.

बोपखेलमधून पुढे खडकीत ५१२ येथे निघणारा पर्यायी रस्ता कायमस्वरूपी करण्यासाठी मुळानदीवर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 44 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. मात्र खडकीच्या दारूगोळा कारखान्याच्या आसपास निघणा-या या रस्त्यासाठी लष्कराचे ना-हरकत प्रमाणपत्र व उड्डाणपुलासाठी जागा मिळत नसल्याने बोपखेल आणि खडकी दरम्यानचा प्रस्तावित उड्डाणपूल रखडला होता.

लष्कराने बोपखेल आणि खडकी दरम्यान उड्डाणपूल उभारण्यासाठी आवश्यक जागा देण्याची तयारी दाखविली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना ४ एप्रिल २०१८ रोजी संरक्षण खात्याचे रक्षा संपदा अधिकारी राजेंद्र पवार यांनी पत्र पाठविले आहे.