पिंपरी : अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला महापालिका हद्दीतील बोपखेल गावचा रस्त्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. लष्कराकडून जागा मिळत नसल्याने बोपखेल ते खडकी दरम्यान मुळा नदीवरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम कागदावर राहिले होते. परंतु, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी वारंवार दिल्ली दरबारी जाऊन उड्डाणपुलाला लष्कराची जागा मिळवण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. लष्कराने उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात देण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. त्याबाबत संरक्षण मंत्रालयाने आमदार जगताप यांना पत्राद्वारे कळविले आहे.