बोपखेल परिसरात विकसित होणार उद्यान

0
नगरसेवक डोळस यांच्या पाठपुराव्याला यश
दिघी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोपखेल येथील आरक्षित जागेवर महापालिकेतर्फे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटी 13 लाख रुपये इतका खर्च येणार आहे. स्थानिक नगरसेवक विकास डोळस यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची बोपखेल येथे आरक्षित जागा आहे. त्याठिकाणी महापालिकेतर्फे उद्यान विकसित करण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागातर्फे निविदा मागविण्यात आल्या. मूळ तीन कोटी 34 लाख 3 हजार 253 रुपये किंमतीच्या या कामासाठी रॉयल्टी आणि मटेरीअल टेस्टिंग चार्जेस वगळून 3 कोटी 31 लाख 26 हजार 519 रुपयांवर निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार मेसर्स डी.डी.कन्स्ट्रक्शन, मेसर्स बी.व्ही.इंडिया लिमिटेड, मेसर्स बी.के.खोसे आणि मेसर्स यशक असोशिएट्स या चार ठेकेदार कंपन्यांनी निविदा सादर केल्या.
आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित करणार
याबाबत बोलताना नगरसेवक विकास डोळस म्हणाले की, बोपखेल-दिघी परिसरातील विविध आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. आरक्षण विकसित केल्यास प्रभागातील नागरिकांना त्या सुविधेचा उपयोग होईल. आरक्षणाचा मुख्य उद्देश देखील साध्य होणार आहे. आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित केली जाणार आहेत. उद्यानाचे आरक्षण ताब्यात घेण्यासाठी आम्ही चारही नगरसेवकांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर आरक्षण ताब्यात घेतले. त्यासाठी निधी मंजूर करुन घेतला. कामाला मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. आरक्षण ताब्यात घेण्यासाठी नगरसेवक लक्ष्मण उंडे, निर्मला गायकवाड, हिराबाई घुले यांचे देखील सहकार्य मिळाले.