दुबई: दुबई खुल्या ड्यूटी फ्री पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा पोलंडचा साथीदार मॅटकोव्हेस्की यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. पुरूष एकेरीत ब्रिटनचा ऍन्डी मरे, फ्रान्सचा पौली तसेच स्पेनच्या बिगर मानांकित व्हर्डेस्को आणि हॉलंडचा रॉबिन हॅस यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. पुरूष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात बोपण्णा आणि मॅटकोव्हेस्की यांनी लियांडर पेस व गुलीर्मो गार्सिया लोपेझ यांचा 6-3, 3-6, 10-6 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
हार्डकोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत बोपण्णा आणि मॅटकोव्हेस्की यानी अचूक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिला. पहिला सेट जिंकल्यानंतर पेस आणि लोपेझ यांनी दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली. पण तिसऱया आणि निर्णायक सेटमध्ये बोपण्णा व मॅटकोव्हेस्की यांनी आपली सर्व्हिस अधिक वेळ राखत पेस व लोपेझ यांचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत भारताच्या एकाही स्पर्धकाने पुरूष एकेरीमध्ये भाग घेतलेला नाही. पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ब्रिटनच्या ऍन्डी मरेने जर्मनीच्या फिलीप कुहेलश्रेबरवर 6-7 (4-7), 7-6 (18-16), 6-1 अशी मात करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले.