खडकी : बोपोडी येथील रविराज हेरिटेज या उच्चभ्रू सोसायटीतील बंद सदनिकेच्या टेरेसवरील दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील सोन्यांचे दागिने, लॅपटॉप व रोख रक्कम असा एकूण एक लाख 31 हजार 500 रुपयांच्या ऐवज घेऊन पोबारा केला. ही घटना 25 रोजी पहाटे घडली असून खडकी पोलिसांनी या प्रकरणी 27 रोजी अज्ञात इसमाच्या नावे गुन्हा दाखल केला आहे. या घरफोडीने सोसायटीमधील रहिवाश्यांमध्ये घबराहट पसरली असून तत्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.
घर बंद असल्याचा घेतला फायदा
अन्वर हुसेन बुडन शेख (वय 26, रा. रविराज हेरिटेज सोसायटी, भाऊ पाटील रोड, बोपोडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. शेख यांची मुलगी आजारी असून तिच्यावर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते 2 मार्च रोजी कुटुंबीयांसमवेत खडकी येथे आपल्या नातेवाईकांकडे काही दिवस राहण्यासाठी गेले होते. दिनांक 25 रोजी दुपारी सव्वा बारा वाजता ते आपल्या बोपोडी येथील सदनिकेत गेले असता कपाट उघडलेले व बेडरुममधील सामान आस्तव्यस्त अवस्थेत विखुरलेले त्यांना दिसले. दरवाज्याला टाळे असताना सदनिकेत कोणी व कसा प्रवेश केला? असा प्रश्न शेख यांच्या मनात आला. त्यानी टेरेसवर जाऊन पाहिले असता तेथील दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला.
पोलिसांची घटनास्थळी धाव
यावर घरात चोरीचा प्रकार घडल्याची खात्री झाल्यावर शेख यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.एन. शिंदे व पथक घटनास्थळी पोहचले. पाहणी नंतर पंचनामा करण्यात आला. सदर घरफोडीच्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी साडे सहा तोळ्यांचे (सोन्याचे नेकलेस, बांगड्या, गंठण, कानातील कर्णफुले, अंगठ्या व चैन) सोन्याचे दागिने, सोनी कंपनीचा एक लॅपटॉप व अडीच हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण एक लाख 31 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला असल्याचे पोलिसांना तपासात दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमांच्या नावे गुन्हा दाखल केला असून त्याचा पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.एन. शिंदे पुढील तपास करीत आहेत.