बोपोडीत अतिक्रमण कारवाईत दहा दुकाने केली जमिनदोस्त

0

खडकी । बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावरील 10 दुकाने व 14 पत्र्यांची शेड सोमवारी (दि.20) महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने हटविण्यात आली. पालिकेच्या वतीने मागील 17 वर्षांत परिसरात केलेली ही तिसरी कारवाई ठरली आहे. महापालिकेचे सहआयुक्त श्रीनिवास कंदुल यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळी 10 वाजता भाऊ पाटील रस्त्यावरील मैलाशुद्धीकरण प्रकल्पाशेजारी ही कारवाई करण्यात आली. यावेळी मालमत्ता विभागाचे अधिकारी रमेश इंगवले रस्ता रुंदीकरण विगाभाचे अधिकारी देव व दोन्ही विभागांची पथके उपस्थित होती. महापालिकेचे 40 कर्मचारी 10 आतिक्रण वाहने 4 जेसीबी एनडी स्क्वॉडचे दंगल विरोधी पथक तसेच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त या कारवाईत सहभागी झाले होते.

या कारवाई अंतर्गत यावेळी 10 दुकाने व 14 पत्र्यांचे शेडस जमिनदोस्त करण्यात आली. रस्ता विकास आराखड्यानुसार नियोजित 30 मीटर रस्ता रुंदीकरणात ही कारवाई करण्यात आली. मागील 17 वर्षांत महापालिकेच्या वतीने या परिसरात तिसर्‍यांदा ही कारवाई मोहीम राबवली गेली आहे. 2000मध्ये येथील 12 निवासी बांधकामे व काही दुकाने हटविण्यात आली होती. त्यानंतर 2005 व 2016मध्ये येथील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली होती.कारवाईनंतर महापालिका व रस्ता रुंदीकरण विभागाच्या वतीने तातडीने या जागेवर कुंपण घालून रस्ता रुंदीकरण न केल्यामुळे या भागात वारंवार अतिक्रमणे केली जात होती. त्यामुळे महापालिकेवर या परिसरात तिसर्‍यांदा अतिक्रमण मोहीम राबविण्याची वेळ आली.

रस्ता रुंदीकरणाची सीमारेषा आखणार
या प्रकरणातून महापालिकेने धडा घेत सोमवारी केलेल्या कारवाईनंतर तातडीने या ठिकाणी तारेचे कुंपन घालून रस्ता रुंदीकरणाची सीमारेषा आखून ही जागा रस्ता रुंदीकरण विभागाच्या ताब्यात सुपुर्द केली जाणार असल्याचे यावेळी महापालिका अधिकारी इंगवले यांनी सांगितले.