बोपोडी पोलिस चौकीचे आवार बनले वाहनतळ

0

हाकेच्या अंतरावर असलेले वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका

खडकी । बोपोडी पोलिस चौकीसमोर अगदी प्रवेशद्वाराला लागूनच मागील काही दिवासांपासून चारचाकी वाहने लावून वाहनधारक चक्क वाहनतळाचा अनधिकृतरित्या लाभ घेत आहेत. यामुळे पोलिस कर्मचार्‍यांसह तक्रारदार नागरिकांना ही त्रासाची झळ सोसावी लागत आहे. खडकी पोलिस व शेजारीच हाकेच्या अंतरावर असलेले वाहतूक पोलिस कार्यालयातील पोलिस या प्रकरणी बघ्याची भूमिका घेत असल्याने हे प्रकार सर्रासपणे चालू आहे.

खडकी पोलिस ठाणे हद्दीतील बोपोडी पुणे मुंबई महामार्गालगत बोपोडी पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. या पोलिस चौकी अंतर्गत अनेक भाग संवेदनशील म्हणून ओळखला जातात. पोलिसचौकी शेजारीच सह्याद्री रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या वतीने दुचाकींकरिता तळमजल्यावर तर रुग्णालयाच्या मागे डॉक्टर व इतर स्टाफ करिता चारचाकी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र चारचाकी वाहनतळ अगदी कमी क्षमतेचे असल्याने रुग्णालयातील अधिकारी आपले चारचाकी वाहने बोपोडी पोलिस चौकीजवळ लावत आहेत. रुग्ण व त्यांचे नातेवाईक ही पोलिसचौकी समोरच अगदी प्रवेशद्वारा जवळच वाहने लावत असल्याने पोलिस चौकी अक्षरश: या वाहनामुळे झाकून जात आहे. नवीन लोकांना पोलिस चौकी शोधावी लागत आहे.पोलिस चौकी समोरच वाहने लागत असल्याने पोलिस कर्मचार्‍यांसह तक्रारदार नागरिकांना पोलीस चौकीत येता-जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

अडथळा ठरणार्‍या वाहनांवर कारवाई
बोपोडी वाहतूक पोलिस निरीक्षक पेडगांवकर याप्रकरणी म्हणाले, खडकी पोलिस कर्मचारी जे वाहनधारक पोलिस चौकीसमोर वाहने लावतात, त्यांना का हटकत नाही? ते का गप्प बसतात? असा उलट सवाल करीत खडकी पोलिसांवर त्यांनी पलटवार केला. पोलिस चौकीसमोर व वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या वाहनधारकांवर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.