शिरपूर: गरज ही शोधाची जननी असते. आजपर्यंत जे अनेक शोध लागले ते ठरवुन लागलेले नाहीत तर मानवाच्या गरजेतुन, कल्पकतेतुनच लागले आहेत.गरजेतुनच जिज्ञासा वृत्ती वाढते व नवनिर्माण होते. असेच शेती कामासंबंधीत खत देण्यासाठी छोट्या यंत्राचा शोध बोराडी येथील प्रगतीशील शेतकरी सचिन पवार यांनी लावला आहे.
सध्या कोरोना संसंर्गामुळे सर्वत्र लाॅकडाऊन असल्यामुळे शेतीच्या कामांसाठी मजुर मिळणे अवघड झाले आहे. जे मिळतात ते मजुरी जास्त मागतात किंवा शेतकरी बांधवांकडे पैसे नसल्यामुळे मजुरी देणे कठीण झाले आहे. पवार यांना शेतातील वांगी पीकाला खत द्यायचे होते.त्यासाठी त्यांनी मजुरांचा तपास केला तर या कामासाठी आठ दिवसपर्यंत रोज सहा मजुर लागतील व त्यासाठी आठ-दहा दिवस थांबावे लागेल असे सांगितले. मग आपल्यालाच यासाठी काही करता येईल का असा विचार करुन त्यांनी जुगाड केला तीन फुटाचा प्लॅस्टिकचा पाईप घेऊन,एका बाजुला इंग्रजी टी आकाराची लोखंडी पट्टी(गिट्टी) बसवली व दुसरे बाजुला टाकाऊ डब्याचे नरसाळे बसविले. रोपाला खत देताना पट्टीचा भाग रोपाजवळ जमिनीत तिरकस खोचायचा व नरसाळ्यातुन खत टाकले की ते बरोबर रोपाजवळ खड्ड्यात पडते. पट्टी काढल्याबरोबर माती झाकली जाते. पारंपरिक पद्धतीने खाली बसुन प्रत्येक रोपाजवळ थोडे खोदुन खत टाकावे लागते.यामुळे वेळ वाया जातो व जास्त मणुष्यबळ लागते. या नवीन पद्धतीने चार-पाच माणसांचे काम एकच व्यक्ती कमी वेळेमध्ये करु शकतो व उभ्यानेच काम असल्याने कंबर,गुडगे दुखीचा त्रास असलेल्यांना सोईचे होणार आहे. यासाठी केवळ पन्नास-साठ रुपये खर्च येतो. असे साहित्य शेतकरी बांधवांनी वापरात आणावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे.
या उपक्रमाचे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, शामकांत पाटील, गणेश भामरे यांनी कौतुक केले आहे.