बोराडी फाट्यावर भीषण अपघात : दोघे ठार

शिरपूर : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात शिरपूर तालुक्यातील दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. हा अपघात शिरपूर तालुक्यातील सांगवी गावाजवळील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बोराडी फाट्यावर शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाला पाठलाग करून अटक करण्यात आली. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

दुचाकीला ट्रकची धडक
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शनिवार, 18 जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सांगवी गावातील बोराडी फाट्यावर भरदाव भरधाव ट्रक (एम.पी.09 एच.एच.8047) ने दुचाकी (एम.पी.46 एम.डब्ल्यू.5242) क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार शांतीलाल झीन्या रावत (22, ग्राम केली, बारीफाल्या, सुस्तीखेडा, बडवानी, मध्यप्रदेश)व संभू तिरसिंग पावरा (65, हिसाळे मलखानगर, ता.शिरपूर) हे दोघे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलिसांनी धाव घेतली. अपघातातील दोघांना रुग्णवाहिकेतुू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून दोघांना मयत घोषित केले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली व काही वेळेनंतर पोलिसांनी ती सुरळीत केली.

पाठलाग करून ट्रक चालकाला पकडले
ट्रक चालक दुचाकीला उडवल्यानंतर वाहनासह पसार झाला मात्र काही अंतरापर्यंत पोलिसांनी त्याचा पाठलाग केला व ट्रक चालक ब्रिजेश कुमार उदयसिंग बघेल (चिरारी पोलालपुर, केरला) यास अटक केली. त्याच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.