बोरावलचा अ‍ॅपे चालक रीक्षा अपघातात जागीच ठार

यावल : तालुक्यातील बोरावल बुद्रुक येथून शहराकडे निघालेल्या अ‍ॅपेला अपघात झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. विनोद विकास सपकाळे (35, रा.बोरावल बुद्रुक) असे मयताचे नाव आहे.

अ‍ॅपे कलंडल्याने अपघात
बोरावल बुद्रुक, ता.यावल येथील रहिवासी विनोद विकास सपकाळे (35) हा तरुण अ‍ॅपे (क्रमांक एम.एच. 19 व्ही.1463) घेऊन शुक्रवारी दीड वाजेच्या सुमारास यावल शहरात येत असताना बोरावल बुद्रुक गावाबाहेर सुमारे अर्धा किमी अंतरावर कैलास धनगर यांच्या शेताजवळ अ‍ॅपेला अपघात घडला व अ‍ॅपे रस्त्याच्या बाजूला कलंडली. या अपघातात विनोद यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती पोलिस पाटील किरण पाटील यांनी तातडीने यावल पोलिसांना दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अजमल खान पठाण हे पथकासह दाखल झाले व त्यांनी मयत विनोद सपकाळे यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवला. डॉ.शुभम तिडके यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह नातेवाईकांना सोपवला. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. विनोद सपकाळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे.