बोरीभडक येथे राष्ट्रवादीचे रास्ता-रोको आंदोलन

0

यवत । राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून या सरकारला शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची जाण नसल्याने शेतकर्‍यांची परिस्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी राष्ट्रवादी पक्ष शेतकर्‍यांची बाजू घेऊन यापुढे रस्त्यावर उतरून प्रश्‍न सुटेपर्यंत राज्यात लढा देत राहील, असा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष व दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरीभडक फाटा येथे मंगळवारी (दि.21) रास्ता-रोको आंदोलनादरम्यान दिला आहे.कानगाव येथील शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी गेल्या 20 दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दौंड तालुक्यातील बोरीऐंदी, बोरीभडक, डाळींब, सहजपूर आदी गावांतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रास्ता-रोकोप्रसंगी थोरात बोलत होते.

अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, विकास खळदकर, नितीन दोरगे, कैलास अतकीरे यांची भाषणे झाली. यावेळी सभापती मीना धायगुडे, गुरुमुख नारंग, गणेश कदम, ज्योती झुरंगे, लक्ष्मण दिवेकर, महादेव यादव, दिलीप हंडाळ, श्रीरंग म्हस्के, डाळींबच्या सरपंच वैशाली धिवार, आकाश गव्हाणे, रविंद्र गायकवाड, भाऊसाहेब ताम्हाणे आदी उपस्थित होते.दरम्यान आंदोलनाबाबत मुख्यमंत्री चर्चेसाठी तयार आहेत. याबाबत कानगाव ग्रामस्थांची सोमवारी विठ्ठल मंदिर येथे सकाळी शेतकर्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीत मंगळवारी (दि.21) मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री अशा दोन टप्प्यात होणार्‍या बैठकीसाठी शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने शिष्टमंडळाची निवड करण्यात आली.परंतु मुख्यमंत्र्यांशी होणारी चर्चा आणि न्याय निर्णय गावच्या ग्रामसभेत शिष्टमंडळ माघारी आल्यानंतर चर्चेचा मसुदा मांडेल आणि सर्व शेतकर्‍यांच्या बरोबर चर्चा करूनच आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती शेतकरी आक्रोश कृती समितीचे ज्ञानेश्‍वर शेळके यांनी दिली. जोपर्यंत निर्णायक तोडगा निघणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचा शेतकर्‍यांनी निर्धार केला आहे.

शवासन आंदोलन
सोमवारी संपकरी शेतकर्‍यांनी शवासन आंदोलन करीत फडणवीस सरकारचा निषेध केला. या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी शिरूर तालुक्यातील न्हावरे, कुरुळी तसेच पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथील ग्रामस्थांनी गावे बंद ठेवत सरकारचा निषेध केला आहे.