नीरा डाव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावरील पाणी चोरी उघड
वालचंदनगर : पाटबंधारे विभागाने नीरा डाव्या कालव्यातील सुमारे 75 बेकायदा सायफन जेसीबी यंत्राच्या साह्याने काढून टाकली. बोरी, लासुर्णे, जंक्शन, भरणेवाडी, अंथुर्णे या परिसरात ही कारवाई करण्यात आली.
नीरा डाव्या कालव्यामधून अनेक जण सायफनद्वारे कालव्यातून पाण्याची चोरी करून विहिरीमध्ये सोडतात. विहिरीतील पाणी पाइपलाइनद्वारे शेततळी व शेतामध्ये सोडले जाते. अशाप्रकारे पाणीचोरी झाल्यामुळे अनेक शेतकर्यांना पाणी मिळण्यास विलंब होतो. यातून मग आंदोलनाचे प्रकार घडतात. 15 डिसेंबरच्या सुमारास नीरा डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार असून, तत्पूर्वी सायफनवर कारवाई करण्यात आली.
आवर्तन सुरवातीला शेटफळ तलावामध्ये सोडले जाणार आहे. त्यानंतर रब्बीच्या आवर्तनास सुरवात होणार आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी पाटबंधारे विभाग सज्ज झाला आहे. या कारवाईमध्ये अंथुर्णे विभागाचे शाखाधिकारी श्यामराव भोसले, कालवा निरीक्षक दत्तात्रेय काळे, दिनेश वाघ, सहाय्यक पांडुरंग वाघमोडे, मिथुन कांबळे यांनी सहभाग घेतला.
फौजदारीचा इशारा
यासंदर्भात शाखाधिकारी श्यामराव भोसले यांनी सांगितले की, अनधिकृत सायफनद्वारे पाणी चोरी करणार्याचे सायफन तोडण्यात आली आहेत. संबंधित शेतकर्यांना 25 हजार रुपये दंडाची नोटीस पाठविण्यात आली आहे. पुन्हा पाणीचोरी केल्यास फौजदारी कारवाई केली जाईल.