बोर, सीताफळ, चिक्कू, पपईपर्यंत सर्वच फळ बाजारात उपलब्ध

0

सफरचंद शंभरला दीड तर डाळींब तीन किलो…!

शहरात फळांची आवक वाढली

पिंपरी चिंचवड : बाजारात फळांची आवक वाढू लागल्याने दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. सफरचंदपासून पपईपर्यंत सर्वच फळ बाजारात उपलब्ध झाले असून फळांचे दरही कमी झाले आहेत. यामुळे फळांनाही चांगली मागणी होत आहे. पिंपरी बाजार, चापेकर चौक, सांगवी, डांगे चौक, निगडी यासह ठिकठिकाणी फळांची विक्री वाढली आहे. शहरात सफरचंदाची आवक वाढल्याने शंभर रुपयाला दीड किलो तर डाळींब शंभरला तीन किलोचा भाव मिळत आहे.

सीताफळांना मोठ्या प्रमाणात मागणी…

नोव्हेंबरपासून साधारणतः फळांची आवक वाढण्यास सुरुवात होते. अर्ली द्राक्षही बाजारात आले आहेत. पपई, बोर, सीताफळ, चिक्कू या फळांची बाजारात रेलचेल वाढली आहे. सफरचंदचे दरही थोडे कमी झाले असून, 80 ते 120 रुपये किलो दराने विक्री होत आहे. सीताफळांची बाजारात आवक मोठ्या प्रमाणात असून, दर 40 रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. बोरही बाजारात दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्यात गोडवा कमी असल्याने मागणी घटली असून दरही कमी आहेत. बोर 20 ते 25 रुपये किलोने विक्री होत आहेत.

बारमाही फळांच्या किमती कायम…

डिसेंबर महिन्यात द्राक्षांची आवक वाढून स्थानिक बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. केळी, किवी या बारमाही फळांचे दर कायम आहेत. बाजारात टरबूचेही आगमन झाले आहे. परंतु, आवक खूपच कमी आहे. पेरूचीही आवक बाजारात मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पेरु 60 ते 80 रुपये किलो दराने विक्री होत आहेत. येत्या काही दिवसात आवक वाढून दर कमी होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.

पेरु, मोसंबीची आवक स्थिर…

पिंपरी-चिंचवडमधील फळ बाजारात शिमल्यावरून सफरचंद मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. बाजारात गावरान संत्री दाखल झाली आहेत. मात्र त्यांची आवक जास्त झाली नाही. येत्या काही दिवसात गावरान संत्र्याची आवक वाढणार असल्याची शक्यता विक्रेत्यांनी बोलून दाखवली. तसेच बाजारात पपईची आवक स्थिर असून त्याचे भाव ही जैसे थे’ असल्याचे दिसून आले. केरळमधून अननसाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. या आठवड्यातही डाळींबाची आवक जास्त झाली आहे. त्याच्या भावामध्ये कोणतीही वाढ झाली नाही. कलमी पेरू, सिताफळ आणि मोसंबी यांची आवक आणि भाव स्थिर आहेत, अशी माहिती फळ विक्रेता राजू पवार यांनी दिली.

फळांचे किलोचे दर
सफरचंद – 80 ते 120
डाळींब – 30 ते 40
चिक्कू – 50
पपई – 30
केळी – 30
पेरू – 60 ते 80
बोर – 20 ते 25
किवी – 40 रुपये नग