बोलावा विठ्ठल …. पहावा विठ्ठल… !

0

तमिळमध्ये इटु म्हणजे विठ्ठल कटीन्यस्तकर दोन्ही हात कमरेवर ठेवलेला देव असा अर्थ आहे. मद्रासमधील शासकीय प्राच्यहस्तलेख संग्रहालयात ‘लोहदंड उर्फ पंढरपूर क्षेत्र कैफियत’ या नावाचा मोडी लिपीत लिहिलेलामराठी गद्यग्रंथ आहे. हा ग्रंथ कर्नल मॅकेन्झीच्या संग्रहातील आहे. मल्हारभट व लक्ष्मण भट या लेखकांनी या ग्रंथाचे भाषांतराचे व विषयांतराचे काम 27 ऑगस्ट 1807 रोजी पूर्ण केले. खास तंजावरी मराठीत ‘श्रीकृष्ण स्वामीस विठ्ठोबा नाम कैसे झाला, म्हणींचे इटावर उभा राहिला आणि दोन्ही (कर) हात कटावर ठेवून उभा राहिल्यामुळे विठ्ठोबा म्हणून नाम पावला’ असे वर्णन महाराष्ट्राचे दैवतांचा अभ्यास करणारे रा.चिं. ढेरे म्हणतात त्यांच्या ‘विठ्ठल एक महासमन्वयक’ या पुस्तकात विठ्ठलाचा शाध घेतला आहे. बिहारमध्ये ‘बिर कुंअर’ या नावाचा कृष्णरुप पावलेला अहिराचा (अभिराचा गोपीजनांचा) एक प्रख्यात वीर देव आहे. त्यांच्या अनेक मूर्ती कटीहस्तकर आहेत. गो-चोराच्या हल्ल्यातून आपले गो-धन राखतांना मृत्यूमुखी पडलेल्या अहिराला हे देवरुप प्राप्त झाले आहे. तो गोपाळ आहे. वीर तर आहेच, असे डॉ. दलरींचे मत आहे. महाराष्ट्रात, कर्नाटकात गोरक्षकवीरांच्या असंख्य स्मारक शीळा आहेत. त्यांना ‘वीरगळ’ असेही म्हणतात. या स्मृतीशिळेला बिट्टीग, बिट्टीदेव, विठ्ठल असा प्रवास झाला असल्याचा संभव आहे. तरी अगंभामधून, नामदेव ज्ञानेश्‍वर यांच्या ओव्यांमधून आपल्याला विठ्ठलांचा

शोध घेता येतो. सूर्य, शीव, शक्ती, गणेश व विष्णु ह्याची समभावाने उपासना करतात ते मिश्र पाशुपत होते. अशी पंचायतन मंदिरे आठव्या शतकानंतर महाराष्ट्र व भारतात दिसतात. ‘नामा म्हणे येथे दुजा नको भाव, विष्णु तोचि शिव शिव तोची विष्णु’ सार्‍या शैव उपासकांना वैष्णव होण्याची गरज का भासली? मुख्यत: तेराव्या शतकातील महाराष्ट्रातील संतांना यांची मिमांसा करतांना इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून पुढची तीनशे वर्ष वैष्णव उपासना उत्तरेहून दक्षिणेकडे आली. दहाव्या बाराव्या शतकात महाराष्ट्रातून दक्षिणेत गेली. वैष्णव रामानुजनाचार्यांची परंपरा नाथमुनी पुडरीकाक्ष-राममिश्र- यमुनाचार्य-रामानुजाचार्य अशी आहे. नाथमुनी हे दहाव्या शतकातील प्रभावी वैष्णव आहेत. ह्या तामिळ संतांचा वैष्णव मार्गात दबदबा होता की, भक्ती दक्षिणेतच जन्मली ह्याला भागवतानेच मान्यता दिली. ज्ञानेश्‍वरांच्या निकटपूर्ववर्ती काळात बोपदेव व चित्सुखाचार्य हे प्रसिध्द वैष्णव आहेत. महाराष्ट्रात तेराव्या शतकात साधुसतांचा वैष्णव उपासना स्विकारावी लागली कारण देव-देवळे, यज्ञयाग, कर्मकांड ह्या सर्व वर्गाच्या उपासनेवर शैवाचा पगडा होताच. शैव तांत्रिकांच्या व योगाच्या वामपंथीय उपासना प्रचलित होत्या. कर्मकांड, वामाचार, तंत्र ह्या विरोधात नैतीक शुध्दीकरणाचा हा चांगला मार्ग दिसला व शैव व वैष्णव तत्त्वांचा समन्वय होण्याची नैसर्गिक प्रक्रियाच घडली. बहुजन समाज व भक्तीचे हे सुंदरच समीकरण संताना दिसले.

– सरला भिरुड, पुणे
9423006683