नवी दिल्ली : मागील वर्षी आयपीएलच्या लिलावात पवन नेगी या अष्टपैलू खेळाडूला तब्बल ८.५ कोटींची बोली लागल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण त्याची आयपीएलमधील कामगिरी काही तितकीशी चांगली झाली नाही. मात्र आता हाच खेळाडू मला पैसे नको फक्त खेळू द्या अशा विनवण्या करत आहे. २०१६ वर्षाच्या अखेरीस दिल्लीच्या संघाने पवन नेगी याला संघात कायम ठेवलेले नाही. आता पुन्हा एकदा पवन नेगीला आयपीएलच्या लिलावामध्ये उतरावे लागणार आहे. मात्र, यावेळी पवन नेगीवर मागील वर्षाइतकी बोली लागणे अशक्य मानले जात आहे.
स्वत:ला सिद्ध करून दाखवायचे
मागील वर्षी सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंमध्ये पवन नेगी दुसऱ्या स्थानावर होता. नेगीवर साडेआठ कोटींची बोली लावून दिल्लीच्या संघाने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. वाहक्रिकेट.कॉमला पवन नेगीने मुलाखत दिली. २०१७ या वर्षाची सुरूवात मी नव्याने करू इच्छित असल्याचे पवन नेगीने सांगितले. तो म्हणाला की, मला लिलावात माझ्यावर कितीची बोली लागते याची मला पर्वा नाही. मला फक्त जास्तीत जास्त क्रिकेट खेळाण्याची इच्छा आहे. भूतकाळातील गोष्टी विसरून मी नव्याने यंदाच्या वर्षाची सुरूवात करण्यासाठी तयार आहे. मला फक्त चांगले क्रिकेट खेळून स्वत:ला सिद्ध करून दाखवायचे आहे.
किती पैसे मिळतात याची चिंता नाही
मला किती पैसे मिळतात याचे मला अजिबात महत्त्व वाटत नाही. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करणे हे खरे माझ्यासमोर आव्हान आहे, असेही तो पुढे म्हणाला. आपल्यावर साडेआठ कोटींची बोली लागेल असा कधी विचार देखील केला नसल्याचे तो म्हणाला. माझ्यावर लावण्यात आलेल्या बोलीनुसार मी खूप फायदेशीर खेळाडू आहे, हे मला सर्वांना दाखवून द्यायचे होते. त्यामुळे माझ्यावर लावण्यात आलेल्या बोलीच्या जोरावर कुणी माझी तुलना करू नये, माझ्या कामगिरीवर माझी ओळख निर्माण व्हावी, असे माझे नेहमी प्रयत्न असतील. मला साडेआठ कोटी देऊ नका, पण मला आयपीएलमधील सर्व सामने खेळण्याची संधी द्या. खूप आनंद होईन, असे प्रांजळ मत पवन नेगीने यावेळी व्यक्त केले.