बोस्टन । सर्वात जुनी व सर्वात कठीण आणि स्पर्धकांची कसोटी पाहणारी म्हणून ओळखल्या जाणार्या बोस्टन मॅरेथॉनमध्ये जॉफ्री किरुइ व एडना किपलागट या केनियन धावपटूंनी अनुक्रमे पुरुष व महिला विभागात जेतेपद मिळवित आपले वर्चस्व सिद्ध केले. किरुइने ही शर्यत 2 तास 9 मिनिटे, 37 सेकंदात पूर्ण केली. या शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात त्याला अमेरिकेच्या गॅलेन रुपकडून जोरदार प्रतिकार झाला. पण रुपला किरुइच्या वेगाशी बरोबरी करता आली नाही आणि त्याला दुसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. जपानच्या सुगुरू ओसाकोने तिसरे स्थान मिळविले.
दोन मुलांची माता प्रथमः महिलांमध्ये 38 वर्षीय किपलागट ही दोन मुलांची माता असून तिने लंडन, मॉस्को, न्यूयॉर्क व डेगू मॅरेथॉन जिंकल्या आहेत. येथील शर्यतीच्या शेवटच्या एक मैलामध्ये ती एकटीच धावताना दिसत होती. तिने ही शर्यत 2:21:52 से. वेळेत पूर्ण केली. बहरीनच्या रोज चेलिमोने सुमारे एक मिनिट जादा घेत दुसरे स्थान मिळविले. अमेरिकेच्या जॉर्डन हॅसेने तिसरे स्थान मिळविताना 2:23:00 से. अवधी घेतला. तिची ही पदार्पणाची मॅरेथॉन होती आणि तिने नोंदवलेली वेळ ही अमेरिकन विक्रम ठरली.
आणि पाण्यासाठी वापसी!: महिला शर्यतीच्या अखेरच्या टप्प्यात किपलागटने पाणी देणार्या एका केंद्रावरून पाण्याची बाटली घेतली. पण नंतर आपण घेतलेली बाटली दुसर्याची आहे, हे लक्षात आल्यावर ती पुन्हा माघारी आणि बाटली परत करून पुन्हा शर्यत पुढे चालू ठेवली आणि जेतेपदही मिळविले. याबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘मला त्यावेळी पाण्याची फार गरज होती. पाणी न मिळाल्यास माझ्यावर त्याचा परिणाम होईल अशी भीती वाटल्याने मी बाटली घेतली आणि नंतर दुसर्याची वस्तू आपल्याकडे असल्याची जाणीव झाली. त्यामुळे ती परत करण्यासाठी मी माघारी आले,’ असे तिने स्पष्ट केले.
सागरची ’डोळस’ धाव
मॅरेथॉनमध्ये बंगळूरूच्या अंध धावपटू सागर बहेतीने ही ऐतिहासिक शर्यत पूर्ण करून सर्वांचेच लक्ष वेधले आहे. मासाशूट अंधांच्या संघटनेच्या मदतीने 31 वषीय सागर अमेरिकेतील या स्पर्धेत सहभागी झाला आणि या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारा तो भारताचा पहिला अंध धावपटू बनला आहे. बोस्टनमध्ये असणाऱया देविका नारायणच्या मदतीने सागरने 42.16 किलामीटर्स अंतराची ही शर्यत चार तासाहून थोडा अधिक वेळ घेत पूर्ण करून 30,000 स्पर्धकांत 121 वा क्रमांक मिळविला. त्याचे मातापिता विष्णुकांता व नरेश बहेती यांनीही शर्यतीस उपस्थित राहून सागरला प्रोत्साहित केले.