शहादा:शहरातील वर्दळ असलेल्या बोहरी मार्केटमधील लक्ष्मी इलेक्ट्रिकल दुकानाला बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आग लागली. आगीत इलेक्ट्रिकचे सर्व साहित्य जळून खाक झाले असून सुमारे दहा ते पंधरा लाख रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
बोहरी मार्केट समोर हिरालाल मन्साराम दाेधानी यांचे लक्ष्मी इलेक्ट्रिकल साहित्याचे दुकान आहे. दुकान मालक होलसेल विक्रेते असल्यामुळे या दुकानात विविध प्रकारचे मोठ -मोठी इलेक्ट्रिकचे साहित्य भरलेले होते. दुमजली असलेल्या दुकानाच्या दोन्ही मजल्यांवर भरगच्च इलेक्ट्रिक साहित्य होते. अचानक रात्री आठ वाजता दुकानातून धूर निघत होता. नगरसेवक संदीप पाटील यांचेही औषधीचे दुकान या मार्केटमध्ये असल्याने ते त्याठिकाणी आले असता त्यांना दुकानातुन धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची मदत घेऊन दुकानाचे शटर तोडून वीजप्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशामक दलाने दोन तासानंतर आग आटोक्यात आणली. आगीत दुकानातील दोन्ही मजल्यावरील पंखे, वायरचे मोठमोठाले बंडल पीव्हीसी पाईपच्या बारीक नळ्या, वीज फिटिंगचे सर्व साहित्य, छोट्या इलेक्ट्रिकल विद्युत मोटारी आदी सर्व साहित्य जळून खाक झाले होते. दुसऱ्या मजल्यावर आगीत छतावरील पंखे गळून गेले होते. प्रचंड धुरळा झालेला होता. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. तरीदेखील शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अग्नि उपद्रव म्हणून पुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. आगीची माहिती मिळताच सिंधी समाजाच्या असंख्य तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.