ब्रँडींगसाठी पालिकेला प्रायोजकच मिळेना

0

पुणे । सार्वजनिक गणेशोत्सवाच्यानिमित्ताने ब्रँडींग करण्याचा भाजपचा विचार आहे. परंतु महापालिकेला प्रायोजकच मिळत नाही असे समजते.

गणेशोत्सवाचे यंदाचे वर्ष 125 वे 126 वे हा वाद अजून धगधगतोय. मात्र, महापालिकेने 125 वे वर्ष असल्याचे जाहीर करून सत्ताधारी भाजप त्यादृष्टीने कामाला लागले आहे. सचिन तेंडूलकर यांना उत्सवाचे ब्रँड अम्बेसीडर करण्याचा प्रस्ताव आहे. अजून काही चमकोगिरी करून भाजप नेत्यांनाही वावरायचे आहे. यावर्षीच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात उत्सवासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रायोजकांमार्फत अजून 6 कोटी जमवून खर्च करावयाचे आहेत, अशी चर्चा आहे.

निधी जमविण्यासाठी अधिकार्‍यांना जुंपले
पुण्यातील बाजारपेठ आणि बाधकाम व्यावसायिक यांच्या गोटात मात्र वेगळीच चर्चा आहे. भाजपच्या काही उत्साही नेत्यांनी प्रायोजक मिळण्यासाठी खूप खटपटी चालविल्या आहेत. परंतु नोटबंदी आणि नवे कर यामुळे धंद्यात मंदी कशी आली आहे याच्या कहाण्या भाजप नेत्यांना ऐकाव्या लागल्या असे सांगण्यात येते. त्यामुळे काहीसे मागे हटलेल्या भाजपने उत्सवासाठी निधी जमवतच नव्हतो, असा पवित्रा घेतला आहे. निधी गोळा करण्यासाठी पालिकेच्या अधिकार्‍यांना भाजपने कामाला जुंपल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.

खर्चाकडे संस्थांचे लक्ष
उत्सवाचे वर्ष नेमके कितवे याचा समाधानकारक फैसला अजून झालेला नाही. त्यातच पक्षाचा गाजावाजा करण्याचा विषय पुढे आल्याने नगरसेवकांमध्ये संभ्रम आहे. उत्सवासाठी महापालिकेला दावणीला बांधण्यास विरोध आहे. महापालिका 2 कोटी तरी कसा खर्च करणार याबद्दल स्वयंसेवी संस्था बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.