अरबी समुद्रातील शिव स्मारक का केवळ भावनिक मुद्दा असून ते प्रत्यक्षात साकारणे अत्यंत अवघड आहे, त्यासाठी वेळ आणि पैसा तर प्रचंड लागणार आहेच पण पुढील अनेक पिढ्यांपर्यंत त्याची वाट पहावी लागेल, म्हणून ब्राझीलमधील येशू ख्रिस्ताच्या धर्तीवर मुंबई विमानतळानजीक शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जावा, अशी मागणी पत्रकार रवी नायर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्रदेखील लिहले आहे.
विमानातून उतरताना पवई-घाटकोपर येथील डोंगराच्या सान्निध्यात असलेला शिवाजी महाराजांचा पांढ-या रंगातील अश्वारूढ पुतळा पाहून महाराष्ट्राची खऱी ओळख आंतरराष्ट्रीय प्रवाशांना होईल. त्याचबरोबर तो पाहण्याचे एक आकर्षण देखील वाटेल. हा पुतळा उभारण्यासाठी लागणारी जागादेखील शासनाच्या अखत्यारीत आहे. त्याचबरोबर तेथे पर्यावरणाचे कुठलेही नुकसान होणार नाही उलट त्या परिसराचा किल्ल्याचे स्वरुप देऊन मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करता येईल, या संपर्ण प्रकल्पाला 900 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे ख-या अर्थाने स्मारक उभारायचे असेल तर त्या ठिकाणीच असावे. ते वेळेत तयार होईल तसेच ते लवकरच जागतिक पर्यटन केंद्र म्हणूनदेखील नावारुपाला येईल, असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेली 5 हजार कोटींची रक्कम ही चांगल्या कार्यासाठी उपयोगात आणता येईल. सध्या शासनाच्या तिजोरीवर असलेला भार ध्यानात घेता केवळ 900 कोटी बाजूला काढून उर्वरित रक्कम ही शेतकरी वर्गाला देण्यात आलेल्या कर्जमाफीसाठीदेखील उपयोगात आणता येईल.
अरबी समुद्रातील स्मारक हे एका बाजूला असेल. या उलट पूर्व व पश्चिम उपनगरात कुठलेही पर्यटन स्थळ नसल्यामुळे या स्मारकामुळे त्या भागाला एक ओळख मिळेल तसेच शिवाजी महाराज हे आपल्या म्हणजेच जनतेच्या मधोमध राहतील, या मुद्याकडेदेखील रवि नायर यांनी लक्ष वेधले आहे.