नवी दिल्ली : भारताने जगातील सगळ्यात वेगवान क्षेपणास्त्राची अर्थांत ब्राम्होस सुपर सॉनिक (ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगवान) क्रुज क्षेपणास्त्राची बुधवारी यशस्वी चाचणी केली आहे. भारतीय वायूदलाचे विमान सुखोई-30 एमकेआई या लढाऊ विमानाच्या मदतीने या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून भारतीय इतिहासात एक नवा अध्याय रचला गेला.
भारतासाठी ऐतिहासिक क्षण
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांनी स्वतःदेखील याविषयी माहिती दिली आहे. बुधवारी सकाळी बंगालच्या खाडीतून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. वायूदलाच्या सुखोई-30 एमकेआई या लढाऊ विमानाच्या सहाय्याने या ब्राम्होस क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. यामुळे आता जमीन, समुद्र आणि हवा अशा तिन्ही स्तरातून या क्षेपणास्त्राचा मारा केला जावू शकतो, असे सीतारामन् यांनी म्हटले आहे. तसेच हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. ब्राम्होस क्षेपणास्त्राचे वजन अडीच टन येवढे असून, भारताने पहिल्यांदा सुखोई-30 एमकेआई या लढाऊ विमानाच्या मदतीने या क्षेपणास्त्राची चाचणी केली. दोन स्तरातून काम करणारे हे क्षेपणास्त्र असून, या क्षेपणास्त्रामुळे भारतीय वायूदलाची क्षमता वाढली असल्याचे मत निर्मला सीतारामन् यांनी मांडले. दरम्यान, ब्रम्होसच्या या यशस्वी चाचणीमुळे सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे.