दोंडाईचा । राज्यावर कर्जाचा मोठा डोंगर असतांना राज्याच्या प्रमुखांनी शेतकर्यांना संकटातून दूर करण्यासाठी दिलेली कर्जमाफी म्हणजे अतिशय धाडसी निर्णय असून या निर्णयामुळे कायमस्वरूपी दुष्काळी असणार्या आमच्या शिंदखेडा तालुक्यातील शेतकर्यांला मोठा आधार झाला होईल. त्यामुळे शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आपला सत्कार करतो आपण आमच्या वतीने मुख्यमंत्र्याचा सत्कार करून धन्यवाद म्हणा, अशा शब्दात बाम्हणे ता.शिंदखेडा येथील शेतकर्यांनी राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा सत्कार करत सरकारने दिलेल्या कर्जमाफीबाबत आभार व्यक्त केला. पर्यटन व रोहयो मंत्राी जयकुमार रावल हे शिंदखेडा तालुक्यातील बेटावद या गावात दौर्याला जात असतांना बाम्हणे येथील शेतकरी सरपंच विजय बोरसे, उपसरपंच नाारायण निकम, नवल पाटील, परशुराम पाटील, दौलत पाटील, लालचंद चौधरी, बापू पाटील, निंबा पाटील, सुधाकर पाटील, केशव पाटील, बाबु निकम, वसंत पाटील, संजय मराठे यांनी आभार व्यक्त केले.
जलयुक्त शिवारामुळे 12 लाख हेक्टर्स सिंचनाखाली
मागील पंधरा वर्षाच्या कार्यकाळात आघाडी सरकारने प्रत्येक कामात मोठा गैरव्यवहार केला असून त्यामुळे राज्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहीला आहे. 70 हजार कोटी खर्च करून मागील सरकारकडून केवळ 0.1 टक्के सिंचन झाले होते, परंतू मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी डिसेंंबर 2014 मध्ये जलयुक्त शिवार योजनेची घोषणा केली. या योजनेतून केवळ 4000 हजार कोटी खर्च करून 12 लाख हेक्टर जमिनीत सिंचन निर्मिती केल्यामुळे आज शेतीला पाणी, मुबलक वीज, आणि उत्पादीत केलेल्या मालाला योग्य दर यासाठी फडणवीस सरकार काम करीत असून आगामी काळात शेतकर्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
सधन शेतकर्यांनी कर्जमाफीचा फायदा न घेण्याचे केले आवाहन
राज्यातील सर्व शेतकर्यांची कर्जे एक लाख 34 हजार कोटी रुपयांच्या घरात असून ती माफ करणे कोणत्याही सरकारला शक्य नव्हते. परंतु महाराष्ट्राचे धाडसी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतील स्थितीचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी स्वतंत्र सूत्र तयार करण्याचे ठरविले आहे. त्यातून सुमारे 90 टक्केच्यावर शेतकर्यांची कर्जे माफ होतील. त्यापोटी काही रक्कम पुढील काही दिवसांत बँकांना उपलब्ध करून कर्जमाफीची हमी दिली जाईल. त्यामुळे नवीन पीककर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग त्वरित मोकळा झाला आहे. बहुतांश शेतकर्यांची कर्जे ही एक लाख रुपयांच्या मर्यादेतीलच असल्याने त्यांच्यासाठी बँकांना दोन-चार दिवसांतच सूचना दिल्या जातील व थकबाकीदार शेतकर्यांना त्वरित पीककर्ज वितरण सुरू होईल. त्यामुळे शेतकर्यांमध्ये नव्याने एक उम्मीद निर्माण होणार आहे. धनदांडग्या किंवा सधन शेतकर्यांनी या कर्जमाफीचा फायदा उकळू नये, याबाबत शेतकरी संघटनाही सजग आहेत.
शिरपूर ग्रामीण आदिवासी भागातही जल्लोष
शिरपूर । शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले तसेच शिरपूर ग्रामीण आदिवासी भागात या निर्णयानंतर आनंदाचे वातावरण निर्माण होऊन भाजपा कार्यकर्ते व शेतकरी बंधूंनी फटाक्यांचा आवाजात जल्लोष करून एकमेकांना मिठाई वाटप केले. बोराडी, कोडीद, न्यू बोराडी, फत्तेपूर, बोरपाणी, फत्तेपूर, चाकडू व इतर अशा आदिवासी भागातील मोठ्या ग्रुप ग्रामपंचायतींनी अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी कोडीद सरपंच, उपसरपंच माजी जि.प. सदस्य दिलीप पावरा, भाजपा तालुका उपाध्यक्ष भारत पावरा, भाजपा आदिवासी आघाडी उपाध्यक्ष संतोष पावरा, गौतम सोनवणे. विलास पाटील, मंजा पावरा तसेच कोडीद ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामस्थ शेतकरी बंधू उपस्थित होते.
प्रतिनिधी म्हणून सत्कार
शेतकर्यांना गेल्या 3 वर्षापासून सातत्याने दुष्काळाशी सामना करावा लागत होता, त्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीत होता, शेतकर्यांची अडचण लक्षात घेवून राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांना दिलेली कर्जमाफी म्हणजे शेतकर्यांना संकटकाळी धावून येण्यासारखे असून त्यामुळे त्यांचा धन्यवाद व्यक्त करणे आमचे कर्तव्य आहे, त्यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपला सत्कार आम्ही करीत असून आमच्या वतीने आपणा मुख्यमंत्र्यांचा सत्कार करावा, अशी विनंती त्यांनी केली. याावेळी मंत्री रावल यांनी गावातील ग्रामस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.