झियामेन : चीनमधील झियामेन येथे सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत दहशतवादावर चिंता व्यक्त करण्यात आली. परिषदेच्या घोषणापत्रात पाकिस्तानातील लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद यासह एकूण 10 दहशतवादी संघटनांची नावेही देण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दहशतवादाचा मुद्दा उचलून धरल्याने सदस्य राष्ट्रांनी या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून आले. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांची नावे ब्रिक्स घोषणापत्रात समाविष्ट झाल्याने भारतासाठी ही मोठी जमेची बाजू आहे.
एकजुटीने लढण्यासाठी कटिबद्ध
ही परिषद जगभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करत आहे. दहशतवाद कोणत्याही स्थितीत खपवून घेतला जाऊ शकत नाही. सर्व ब्रिक्स देश दहशतवादाविरोधात एकजुटीने लढाई लढण्यासाठी कटिबद्ध आहेत, असेही या घोषणापत्रात म्हटले आहे.
दहशतवादी कारवाया चिंतेची बाब
ब्रिक्स परिषद घोषणापत्रात 48व्या परिच्छेदात दहशतवाद आणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून, तालिबान, आयएसआयएल, अल-कायदा, लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, पूर्व तुर्किस्तान इस्लामिक मुव्हमेंट, इस्लामिक मुव्हमेंट ऑफ उझबेकिस्तान, हक्कानी नेटवर्क, टीटीपी आणि हिज्ब-उत-तहरिर या दहशतवादी गटांकडून आजूबाजूच्या भागांत सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया ही चिंतेची बाब आहे, असल्याचे नमूद केले आहे.
भारताला मोठे यश
भारताने नेहमीच पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र भारताच्या प्रयत्नांना चीनने अनेकदा खीळ घातली होती. मात्र ब्रिक्सच्या घोषणापत्रात दहशतवादी कारवायांबद्दल चिंता व्यक्त झाल्याने भारताला मोठे यश मिळाले आहे. सर्व देशांमध्ये शांतता नांदण्यासाठी एकजुटीने राहणे आवश्यक असल्याचे ब्रिक्सच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी सांगितले. तत्पूर्वी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींचे ब्रिक्सच्या बैठकीत औपचारिक स्वागत केले. चीनमध्ये सध्या ब्रिक्स देशांचे नववे संमेलन सुरु आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा ब्रिक्स देशांमध्ये समावेश होतो.