ब्रिजेश मोगरे यांनी दिल्लीच्या तख्ताला हलवून चुकीचा शिलालेख बदलला

0

मुरुड-जंजिरा (अमूलकुमार जैन) : जिथे सरकारी कचेरीतला कागद वर्षानुवर्ष हलत नाही तिथे आग्र्याच्या भक्कम पोलादी किल्ल्यातील चुकीचा शिलालेख अवघ्या दीड वर्षात हलविण्याची किमया एका मराठी माणसाने करून दाखवली आहे. दिवाण-ए-खासमध्ये औरंगजेबासोबत झालेल्या भेटीतील शिवरायांचा चुकीचा इतिहास सांगणारा शिलालेख पालघरचे इतिहास संशोधक आणि प्रख्यात लेखक ब्रिजेश मोगरे यांनी दिल्लीच्या तख्ताला हलवून बदलण्यास भाग पाडला आहे. दिल्ली सरकारमधील मोगलांच्या वारसांनी लिहिलेला आणि शिवरायांचा घोर अवमान करणारा हा शिलालेख हटविण्यात आला असून तिथे आता नवा शिलालेख दिमाखात झळकला आहे.

पालघरच्या वेवूर या गावात राहणारे ब्रिजेश मोगरे यांनी शिवरायांच्या जीवनावर सखोल संशोधन केले आहे. या संशोधनातून ‘शिवाजी द रियल हिरो’ हे पुस्तक साकारले. या त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन १ मे २०१४ रोजी लंडनच्या संसदेत मोठय़ा दिमाखात करण्यात आले. लंडनच्या संसदेत पुस्तक प्रकाशित होणारे ते पहिले हिंदुस्थानी ठरले आहेत.

शिवरायांच्या जीवनावर संशोधन करताना ब्रिजेश मोगरे यांनी अनेक संदर्भांचा सुक्ष्म अभ्यास केला. काही नवे संदर्भ शोधून काढले. यावेळी त्यांनी आग्र्याच्या किल्ल्यातील शिलालेख तपासला तेव्हा त्यांना धक्काच बसला. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला गेले. तेथे लाल किल्ल्यात ज्या दिवाण-ए-खासमध्ये औरंगजेब आणि महाराजांची भेट झाली त्या बाहेरच हा शिलालेख लावला होता. त्यावरचा चुकीचा आणि मोडतोड केलेला इतिहास पाहून मोगरे संतापले. त्यांनी अक्षरशः पेटून याबाबतचे संदर्भ आणि पुरावे गोळा केले.
आणि नवीन शिलालेख बसवला

शिवरायांचा घोर अवमान करणाऱ्या शिलालेखाबाबत मोगरे यांनी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांचे लक्ष वेधले तसेच नाईक यांच्याकडे सगळे संदर्भ आणि पुरावे सुपूर्द केले. इतक्यावरच न थांबता त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या दीड वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि नाईक यांनी आग्र्याच्या किल्ल्यातील तो शिलालेख हटविण्याचे आदेश दिले. त्याजागी आता नवा शिलालेख बसविण्यात आला असून त्यात शिवराय आणि औरंजेबांच्या भेटीचा योग्य संदर्भ कोरला आहे.

जुन्या शिलालेखावर काय होते
औरंगजेबाच्या दरबारातच त्याला खडे बोल सुनावणाऱ्या छत्रपती शिवरायांचा चुकीचा आणि अवमानकारक इतिहास आग्र्याच्या किल्ल्यातील शिलालेखावर कोरला होता. शिवराय आणि औरंगजेबाच्या भेटीचा संदर्भ देताना या शिलालेखावर सन १६६६ मध्ये याच दिवाण-ए-खासमध्ये शिवाजी आणि औरंगजेबाची भेट झाली. आग्र्यातील उष्णता सहन न झाल्याने शिवाजींना चक्कर येऊ लागली आणि त्यांनी आधारासाठी तिथे जवळच असलेल्या एका खांबाचा आधार घेतला असा उल्लेख करण्यात आला होता.

शिलालेख बदलला गेला याचा मोठा आनंद आहे. हा तमाम शिवप्रेमींचा विजय आहे. ज्यांना मोगलांची तळी उचलायची असेल त्यांनी खुशाल उचलावी, ते तुमचे बाप असतीलही.. पण त्यासाठी आमच्या राजाचा खोटा इतिहास सांगू नका. महाराष्ट्र ते कदापी सहन करणार नाही असे ब्रिजेश मोगरे म्हणाले.