ब्रिटनच्या संसदेवर झालेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या 5, तर 40 जखमी

0

लंडन । ब्रिटन संसदेमध्ये कामकाज सुरू असताना संसद इमारतीच्या बाहेर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांचा आकडा 5 वर पोहोचला असून 40 जण जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये एका हल्लेखोराचा आणि पोलीस अधिकार्‍याचा समावेश आहे.

एका पोलीस अधिकार्‍याला चाकूने भोसकून ब्रिटनच्या संसदेत प्रवेश करू पाहणार्‍या हल्लेखोराला स्कॉटलंड पोलिसांनी कंठस्नान घातले. हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या हल्ल्यात दोन नागरिक ठार झाले. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा हल्ला करण्यामागे किती जण सामील होते, याची माहिती अस्पष्ट आहे.

ब्रिटन संसदेचे कामकाज सुरू असताना या इमारतीच्याबाहेर झालेल्या हल्ल्याचे आवाज संसदेतही ऐकू आले. यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व लोकप्रतिनिधींना हाऊस ऑफ कॉमन्सच्या चेंबरमध्ये सुरक्षितपणे हलविण्यात आले. सर्व लोकप्रतिनिधी सुखरूप आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही दहशतवादासमोर शरणागती पत्करणार नसल्याचे पंतप्रधान थेरेसा मे यांनी स्पष्ट केले.

सर्व भारतीय सुखरूप
लंडनमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर तेथील सर्व भारतीय सुखरूप असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. मी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या संपर्कात आहे. उच्चायुक्तालयाकडून तेथील भारतीयांना आवश्यक ती मदत पुरवली जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाचे संपर्क क्रमांकही दिले आहेत. आवश्यकता भासल्यास 020-86295950 आणि 020-76323035 (लंडन) पीआय आरटी या संपर्क क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

भारत इंग्लंडच्या पाठीशी – मोदी
इंग्लंडमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारत इंग्लंडसोबत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत इंग्लंडच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल, असेही ते म्हणाले. इंग्लंडच्या संसदेबाहेर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत शोक व्यक्त करणारे ट्विट त्यांनी प्रसिद्ध केले. या हल्ल्याबाबत कळल्यावर दु:ख झाले. आम्ही पीडित व त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत, असे ट्विट त्यांनी केले.