तळेगाव दाभाडे येथे स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला
तळेगाव दाभाडे : प्राचीन इतिहास जोपर्यंत आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत आपण जगावर अधिराज्य करू शकत नाही. त्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे. इतिहास न वाचल्यामुळे पराभव झाला. ब्रिटिशांनी आमचे ज्ञान झाकून ठेवले आणि त्यांचा इतिहास आपल्यावर लादला. म्हणूनच आपण इतिहास विसरलो, असे प्रतिपादन अॅड. रवींद्र यादव यांनी केले. समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमवर्षी आयोजित तीन दिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत प्रथम पुष्प गुंफताना अॅड रवींद्र यादव ’प्राचीन भारताचा इतिहास’ या विषयवार बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मावळ भूषण कृष्णराव भेगडे, प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष खांडगे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष रो. अजय पाटील, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कैलास काळे, रो. शंकर हदिमनी, रो. विन्सेट सालेर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आम्ही वैभवशाली इतिहास विसरलो!
अॅड. रवींद्र यादव पुढे म्हणाले की, सन 1835 सालापर्यंत आपल्या देशात एकही भिकारी नव्हता. आता सगळेच भिकारी दिसत आहेत. आपल्या देशाचा सहा हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. तो लिखित स्वरूपातही पाहायला मिळतोय. मराठी माणसे चौकात चर्चा करतात, मात्र कृती काहीच करत नाहीत. चौथी इयत्तेमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास शिकविला जातो. मात्र त्यापुढील इयत्तांमध्ये आपला कोणताच इतिहास शिकविला जात नाही. पुढील वर्गात रशियन राज्यक्रांती, अमेरिकन क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती अशा देशांतील इतिहास शिकविला जातो. युरोपियनांनी त्यांचा इतिहास आमच्यावर लादला. आणि आम्ही आमचा वैभवशाली प्राचीन इतिहास विसरलो. प्राचीन इतिहासातील आंतरजातीय विवाह, अणुशक्ती केंद्र, तक्षशिला व नालंदा विद्यापीठ यासारख्या गोष्टींचे उल्लेख करून त्याबाबत इत्यंभूत माहिती व रामायण, महाभारतातील श्रीकृष्णाचे अनेक दाखले दिले.
खांडगे पाटील परिवारातील मान्यवरांची उपस्थिती
यावेळी खांडगे परिवारातील जेष्ठ वसंतदादा खांडगे, अनुपमा खांडगे, निशीगंधा खांडगे, नंदकुमार काळोखे, गणेश काकडे, अनंत कुलकर्णी, प्रा. प्रमोद बोराडे, रो. अॅड. मच्छिंद्र घोजगे, रो. सुदाम दाभाडे, अनिल धर्माधिकारी, मिलिंद शेलार, बाळासाहेब शिंदे, रो. सुमती निलवे, रो. दशरथ जांभुळकर, रो. डॉ. नितीन नागरे, रो. अनिल दनाईत आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात कृष्णराव भेगडे म्हणाले की, संतोष खांडगे व गणेश खांडगे या खांडगे परिवारातील शिलेदारांनी मागच्या पिढीचा वसा व वारसा समर्थपणे पुढे सुरु ठेवला आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध उपक्रमांमधून आर्थिक दुर्बल घटकांना मोठी मदत होत आहे. मावळ भूषण मामासाहेब खांडगे यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य केल्याचे गौरवोद्गार भेगडे यांनी काढले. स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या इशस्तवनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. प्रास्ताविक समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण मखर व कुसुम वाळुंज यांनी केले. तर आभार अजय पाटील यांनी मानले.