धुळे । गिधाडे ता.शिरपूर गावाजवळील तापी नदीवरील ब्रिटिशकालिन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी प्रसिध्दी दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे यांनी म्हटले आहे की, कार्यकारी अभियंता, रो.ह.यो. (सार्वजनिक बांधकाम) धुळे यांनी प्रस्तावित केल्यानूसार शिरपूर तालुक्यातील सावळदे-सुकवद रस्ता 4.800 मीटर लांबीमध्ये गिधाडे गावाजवळ ब्रिटीशकालिन तापी नदीवरील दगडी कमानीचा 12 मीटर लांबीचा 28 गाळे असलेला पूल 1933 मध्ये बांधण्यात आला होता. हा पूल 20 टन वजनाच्या वाहतुकीसाठी योग्य आहे, परंतु वाळू वाहतुकीच्या ट्रकचे वजन अंदाजे 45 ते 50 टन असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या अवजड वाहतुकीमुळे पूल अचानक पडू शकतो व मोठ्या प्रमाणात जिवित व वित्त हानी होऊ शकते.
या पुलावरुन ओव्हरलोड वाळू वाहतूक बंद करण्यासाठी आवश्यक ती अधिसूचना जारी होणेस संबंधित विभागाने केलेल्या विनंतीनुसार मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33 (स) तसेच मोटर वाहन कायदा कलम 1988 चे कलम 115 अन्वये जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, जिल्हादंडाधिकारी, धुळे यांनी अधिसूचनेव्दारे शिरपूर तालुक्यातील गिधाडे गावाजवळ ब्रिटीशकालीन तापी नदीवरील दगडी कमानीच्या पुलावरून ओव्हरलोड वाळू वाहतूक व 20 टनापेक्षा जास्त वजनाच्या वाहतुकीमुळे जीवित व वित्त हानी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातून हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने अधिसूचनेच्या माध्यमातून कळविले आहे.