बोगद्याजवळ लोखंडी अँगल लावण्यास विरोध ; विरोधानंतर प्रशासन नरमले
भुसावळ- तालुक्यातील साकेगावपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रिटीशकालीन रेल्वे बोगद्याला लोखंडी अँगल लावून रेल्वे प्रशासनाने शेतकर्यांचा वापराचा रस्ता बंद केल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले व रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेविरुद्ध त्यांनी तीव्र संताप करीत विरोध दर्शवल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने लावलेले लोखंडी अँगल काढल्याची घटना गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली. तब्बल अर्धा तास सुरू असलेल्या गोंधळानंतर शेतकर्यांचा उद्रेक पाहता अँगल लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने मागे घेतला.
शेतरस्ता बंद करण्याचा घाट
साकेगावपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर रेल्वेचा ब्रिटीशकालीन बोगदा असून या रस्त्याद्वारे कुर्हा, गोजोरा तसेच वांजोळा जाण्यास सोयीचा मार्ग आहे शिवाय शेतकर्यांची शेतीदेखील बोगद्यापलिकडे असल्याने शेतकरी बैलगाडीसह दुचाकीद्वारे या रस्त्याचा वापर करतात मात्र बोगद्याखालून अवजड वाहतूक होत असल्याने बोगद्याच्या भिंती खचत असल्याची भूमिका रेल्वे प्रशासनाने गुरुवारी घेत बोगद्याच्या प्रवेशद्वारावर लोखंडी अँगल लावले. केवळ दुचाकी जाईल, असा रस्ता शिल्लक असल्याने संतप्त साकेगावचे शेतकरी बोगद्याजवळ धडकले. कर्मचार्यांनी केलेल्या कृतीचा त्यांनी विरोध दर्शवल्यानंतर साकेगाव सरपंच अनिल पाटील यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्यांशी चर्चा केली. या बोगद्याखालून कुठलीही अवजड वाहतूक होत नाही तसेच शेताकडे जाण्यासाठी हा रस्ता असल्याने लोखंडी अँगल लावू नये, अशी विनंती केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने अँगल लावण्याची भूमिका मागे घेतल्याने वादावर पडदा पडला.