ब्रॅण्डेड कंपन्यांच्या बाटल्यांत बनावट शाम्पू

0

चौघा ठगांचा पिंपरी पोलिसांकडून पर्दाफाश

पिंपरी-चिंचवड : भंगारात मिळालेल्या रिकाम्या शाम्पूच्या बाटल्यात बनावट शाम्पू टाकून विकणार्‍या टोळीचा पिंपरी पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला. भाडेतत्वावर घेतलेल्या एका घरावर छापा टाकून पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले. नागरिकांना विशेषतः महिलांना ठगविणारे चौघे आरोपी जेरबंद करण्यात आले असून, काही दिवसांपूर्वी हे ठग शहरात भंगार गोळा करण्याचे काम करत होते. भंगारात मिळालेल्या रिकाम्या बाटल्यांत बनावट शाम्पू भरून ते विकण्याचे काम या ठगांनी सुरु केले होते. दुपारच्यावेळी घरी असलेल्या गृहिणी, तसेच सलून दुकानचालकांना गंडवित त्यांनी हे बनावट शाम्पू या ग्राहकांच्या माथी मारल्याचेही पोलिसांना आढळून आले.

गृहिणीला संशय, पोलिसांना दिली माहिती
बनावट शाम्पूच्या कारखान्याबाबत पिंपरी पोलिसांना बुधवारी गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्याआधारे छापा टाकून पोलिसांनी चौघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून ब्रॅण्डेड कंपन्यांच्या शाम्पूचे रिकामे डबे, नकली शाम्पू आदींसह 842 डब्बे जप्त करण्यात आले आहेत. अंदाजे अडिच लाख रुपयांचा हा मुद्देमाल आहे. निजामुद्दीन बशीरखान उस्मानी (वय 30), इस्लाम गफूरअली सय्यद (वय 19), इसाक खान शमशुद्दीन लोधी (वय 23), नाजीम नूर हसन तेली (वय 25) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना नंतर अन्न व औषधी प्रशासन अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात आले होते. एफडीए व पिंपरी पोलिस अधिकारी या चौघांची कसून चौकशी करत होते. या बनावट शाम्पूबाबत एका गृहिणीला संशय आला होता, तिनेच या प्रकाराची माहिती पिंपरी पोलिसांना दिली होती.