ब्रेकींग न्यूज : पिंप्री-चिंचवड स्थायी समिती अध्यक्षांसह स्वीय सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

दोन लाखांच्या लाच प्रकरणी पुणे एसीबीच्या कारवाईने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ

पुणे : पिंप्री-चिंचवड मनपातील स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्‍वर पिंगळे व स्थायी समिती चेअरमन नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांना पुणे एसीबीच्या पथकाने दोन लाखांची लाच स्वीकारताच अटक केल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली. सभा संपल्यानंतर पाचच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. मंजूर झालेल्या निविदेची वर्क ऑर्डर काढण्यासाठी नऊ लाखांची मागणी केल्यानंतर सहा लाखात सेंटलमेंट ठरल्यानंतर सुरूवातीला दोन लाखांची लाच स्वीकारताना हा सापळा यशस्वी करण्यात आला.

आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता
तक्रारदाराची निविदा मंजूर झाल्यानंतर त्या संदर्भात वर्क ऑर्डर काढण्यासाठी संशयीतांनी नऊ लाखांची लाच मागितली होती मात्र त्यात सहा लाख रुपये देण्याबाबत तडजोड झाल्यानंतर तक्रारदाराने पुणे एसीबीकडे तक्रार नोंदवली. ठरलेल्या रकमेपैकी दोन लाखांचा पहिला हप्ता घेताना स्वीय सहाय्यक ज्ञानेश्‍वर पिंगळे व स्थायी समिती चेअरमन नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांना पकडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरज यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी झाला. पिंगळे व लांडगे यांना ताब्यात घेण्यात आले असून लाच प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरज यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना वर्तवली. लाचपुचपत प्रतिबंधक विभागाने स्थायी समितीचे कार्यालय सील केले आहे. नितीन लांडगे हे भाजपचे आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.