आनंदपूर : पश्चिम बंगालच्या आनंदपूरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याने ब्लू व्हेल गेम खेळाच्या अंतिम टप्प्यात आत्महत्या केल्याची भीती वर्तविण्यात येते आहे. ब्लू व्हेल या गेममुळेच ही आत्महत्या झाल्याचे स्पष्ट झाले तर भारतातला हा दुसरा बळी असेल. अंकन डे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे तो पश्चिम बंगालमधील आनंदपूरमधल्या शाळेत शिकत होता. मागील महिन्यात मुंबईतल्या एका मुलाने ब्लू व्हेल या खेळापायी आपले आयुष्य संपवले.
बाथरूममध्ये सापडला मृतदेह
अंकन आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला तो बाहेर आलाच नाही, त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी बाथरूमचा दरवाजा तोडला, तेव्हा त्यांना अंकनचा मृतदेह आढळला. अंकनच्या चेहर्याभोवती एक प्लास्टिकची पिशवी गुंडाळलेली होती आणि दोरीने गळा आवळण्यात आला होता अशी माहिती अंकनच्या कुटुंबातील सदस्याने दिली. या अवस्थेत अंकनचा मृतदेह सापडल्याने त्याचे पालक घाबरून गेले. अंकन ब्लू व्हेल गेम खेळत होता अशी माहिती त्याच्या एका मित्रानं दिली आहे.
देशातील पहिला बळी मुंबईत
जिवघेण्या ब्लू व्हेल गेमचा भारतातील पहिला बळी मुंबईत गेला. गेल्या महिन्यात एका नववीतील विद्यार्थ्याने अंधेरीतील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याने इंस्टाग्रामवर शेवटचा फोटा सुद्धा अपलोड केला होता. तर शुक्रवारीच डेहराडून येथे पाचवीत शिकणार्या एका मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आले. इंदूर येथे एका 13 वर्षीय मुलाचा ऐनवेळी जीव वाचला. तत्पूर्वी, या गेमच्या नादात सोलापूरहून पुण्याला जाण्याचा प्रयत्न करणार्या एका मुलाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन घरी पाठवले.