‘ब्लू व्हेल गेम’ पोलिसांना आदेश

0

पुणे । ब्लू व्हेल गेमचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने या मृत्यूसंदर्भात नुकतीच एक बैठक बोलवली होती. बैठकीमध्ये जर कोणी मूल अबोल झाले असेल तर त्यावर विशेष नजर ठेवावी तसेच याविषयी जागरुकता निर्माण करावी. गरज पडल्यास पालकांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यास सांगण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले असून ब्लू व्हेल गेम खेळणार्‍या मुलांची लक्षणे ओळखण्याविषयी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

या बैठकीस महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळमधील पोलिस अधिकार्‍यांशिवाय टेलिकॉम कंपन्यांचे आणि गृह मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी ब्लू व्हेल गेममुळे झालेले मृत्यू आणि गेम खेळणार्‍या मुलांनी केलेला आत्महत्येचा प्रयत्न याविषयावर चर्चा करण्यात आली. अशा घटना कशा रोखता येऊ शकतात यावरही चर्चा करण्यात आली. पोलिस अधिकार्‍यांना ब्लू व्हेल गेमच्या लिंकवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले.

मुलांचे ब्रेन वॉश केले जाते
ही गेम चालविणारे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे कोणतेही नुकसान करू शकत नाही. हे सर्व प्रथम मुलांना समजून सांगावे. ही गेम मुलांचे ब्रेन वॉश करत असल्याने सर्वप्रथम त्यांना जगण्याच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असते. गेमद्वारे येणारे आदेश पाळू नयेत. ते बंधनकारक नसते याबाबत मुलांना सांगा. तुम्ही कधीही गेम खेळणे बंद करू शकता. तुमचे कोणीच काही बिघडवू शकत नाही, हे मुलांना विश्‍वासात घेऊन सांगा असा उपाय यावेळी सुचविण्यात आला.

मुलांची लक्षणे
ब्लू व्हेल गेम खेळणार्‍या मुलांचे निरीक्षण करून त्यांच्यामध्ये झालेले बदल टिपण्यासाठी अशा मुलांची काही लक्षणे नमूद करण्यात आली. यामध्ये मुलांच्या अंगावर जखमा आढळल्यास ती खरेच कोणत्या कारणाने झाली याचा तपास करणे गरजेचे आहे. मूल गप्प राहत असेल आणि इंटरनेटचा लपून वापर करत असेल तर सावध राहावे. इंटरनेट वापरू न दिल्यास चिडचीड करत असेल तर असे काय घडत आहे याचा तपास करणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर या मुलाच्या कोणत्याही पोस्टवर ब्लू गेमचा फोटो दिसत असल्यास सावध राहावे. रात्री उशिरापर्यंत इंटरनेटचा वापर करत असल्यास तो नेमका काय करतो हे जाणून घ्या. तसेच अशा घटनांची नोंद घेण्याच्या सूचना देऊन पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले.