ब्लू व्हेल जीवघेण्या खेळाचा मुंबईतील पहिला बळी

0

मुंबई : मोबाइलमध्ये भरमसाठी खेळ आले आहेत. त्यातील अनेक खेळ आता जीवघेणे ठरत आहेत. पोकेमॅन नावाच्या अशाच एका खेळाने लहान मुलांचे मती गुंग करून टाकली आहे. त्यातच आता ब्लु व्हेल नावाचा जीवघेणा खेळ आला आहे. रशियामध्ये या जीवघेण्या खेळाच्या नादात 100 मुलांनी आत्महत्या केली. हा खेळ मुंबईतही पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे. मुंबईत एका लहान मुलाने या खेळात जिंकायचे म्हणून आत्महत्या करण्याचे शेवटचे आव्हान स्वीकारले आणि अखेर त्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे आता पोलीस खाते खडबडून जागे झाले आहे. या घटनेवरून आता मानसोपचार तज्ज्ञही अभ्यास करू लागले आहेत.

मुलाने स्वतःच्या अंगावर केल्या गंभीर जखमा
अंधेरी (पश्चिम) येथे राहणार्या 14 वर्षीय मुलाने शनिवारी इमारतीच्या पाचव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यापूर्वी त्या मुलाने स्वतःच्या शरीरावर अनेक जखमा करून घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा ब्लु व्हेल या जीवघेण्याचा खेळाचा बळी आहे का, या दिशेने पोलीस आता तपास करू लागले आहेत.

पोलिसांकडून मानसोपचार तज्ज्ञांची मदत
पोलीस आता त्या मुलाचा मोबाइल, व्हाटस अॅूपवरील चॅटींग तपासू लागले आहेत. कारण या मुलाने कोणतीही सुसाईड नोट सोडलेली नाही किंवा मुलावर कोणताही अभ्यास ताण नव्हता. मेघवाडी पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यासाठी पोलीस सर्व शक्यता तपासत आहेत. या आत्महत्येमागील नक्की कारण कोणतेही हे पोलीस शोधत आहेत. मानसोपचार तज्ज्ञही या आत्महत्येमागे मुलाच्या मानसिकतेचा अभ्यास करत आहेत. दरम्यान पोलिसांनी एक पथक मुलाच्या शाळेतही पाठवले आहे. हे पथक त्या मुलाच्या मित्रांसोबत बोलणार आहे.

काय आहे ब्लु व्हेल?
लहान मुले या खेळाचे बळी ठरत आहेत. हा खेळ 50 दिवस चालतो. या खेळाचे नियंत्रण असलेल्या ठिकाणाहून संबंधित मुलाला दररोज एक धाडस करण्याचे आव्हान दिले जाते. हळूहळू हे आव्हान अधिक गंभीर बनत जाते. शेवटच्या दिवसाच्या काही दिवस आधी तर स्वतःच्या शरीरावर जखमा करून घ्या, असे सांगितले जाते. 50 व्या दिवशी आता तुम्ही आत्महत्या करा, त्यासाठीचा प्रकारही दिला जातो. हा खेळ खेळत असतांना 50व्या दिवशी संबंधित मुलाची आत्महत्या करण्याची मानसिकता तयार झालेली असते आणि तो प्रत्यक्षात आत्महत्या करतो. रशियात अशा प्रकारे 100 मुलांनी आत्महत्या केली, त्यामुळे या खेळाच्या निर्मात्याला अटक करण्यात आली.