भुसावळ : लॉकडाऊनची संधी साधून परप्रांतात जाणार्या गाड्यांची तिकीटे काढून त्याची ब्लॅकमध्ये विक्री करणार्या दलालांविरुद्ध मध्य रेल्वेच्या रल्वे सुरक्षा दलाने मोहिम राबवत तब्बल 44 दलालांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून आठ लाख 62 हजार 191 रुपये किंमतीची तिकीटे जप्त केली आहेत. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना अटकदेखील करण्यात आली.
दलालांविरुद्ध धडक मोहिम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेल्वे सेवा बंद असलीतरी परप्रांतीय प्रवाशांसाठी मात्र 12 मे 2020 पासून 15 वातानुकूलित विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या शिवाय 1 जून 2020 रोजी निवडक विशेष मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या 100 चालवण्यात आल्या व ही संधी साधून दलालदेखील सक्रिय झाले होते. वैयक्तिक आयडी वापरुन ई-तिकिटे काढून आरक्षित तिकीटांची चढ्या दराने विक्री होत असल्याची तक्रारी आल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने धडक मोहिम राबवत मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांवरील वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषतः खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात छापेमारी केली. लॉकडाउन आणि अनलॉक कालावधी दरम्यानच्या या छाप्यांत सर्व मिळून 44 दलालांना पकडण्यात आले व त्यांच्याकडून आठ लाख 62 हजार 191 किंमतीची 479 लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली.
आरपीएफचे कोरोना योद्धा म्हणून काम
कोविड-19 साथीच्या काळात रेल्वेच्या सामाजिक जाणिवेच्या प्रत्येक बाबीमध्ये मध्य रेल्वे आरपीएफची टीम कोरोना योद्धा म्हणून उभी राहिली. रेल्वे मालमत्तेचे रक्षण, रेल्वेच्या आवारात आणि प्लॅटफॉर्मवर श्रमिकांच्या प्रवेशाचे नियमन आणि लॉकडाऊन दरम्यान अडकलेल्या प्रवाशांना अन्न पॅकेटचे वितरण त्यांनी केले. लहान मुलांची सुटका करून त्यांच्या कुटूंबियांशी पुन्हा भेट घालून देण्यासाठी, श्रमिक विशेष गाडीत ज्येष्ठ नागरीकांना किंवा अपंग प्रवाशांना ट्रेनमध्ये बसण्यास मदत करण्यासाठी, गर्भवती महिलांना वेळेवर वैद्यकीय सहाय्य करण्यासह ट्रेनमध्ये बसण्यास मदत करण्यात आली शिवाय कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी सहकार्यांसाठी नाविण्यपूर्ण मास्कही त्यांनी तयार केले. गुन्हेगारांवर नजर ठेवून अंमली पदार्थ, ट्रेनमध्ये चोरलेले मोबाईल फोन इत्यादी जप्त करण्याचे कामही रेल्वे सुरक्षा बल करीत आहे.