पुणे : रस्त्याच्या बाजूला पंक्चर झालेला टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या टेम्पोवर भरधाव एसटी बस आदळून झालेल्या भीषण अपघातात नऊ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला तर 14 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर काहींना तेथे प्राथमिक उपचार करून पुणे येथे हलविण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी दीड वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. भरधाव असलेल्या बसच्या चालकाला पावसामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या टेम्पोचा अंदाज आला नाही, अन् तो सरळ कांद्याच्या गोण्यांनी भरलेल्या या टेम्पोवर जावून आदळला, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, सोमवार हा ‘ब्लॅक मंडे‘च ठरला. नारायणगावसह राज्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या भीषण अपघातात एकूण 20 प्रवासी ठार झाले असून, 43 जण गंभीर जखमी झालेले आहेत. नाशिक-येवला महामार्गासह, मुंबई-गोवा महामार्गावर हे अपघात घडले आहेत.
पंक्चर झालेल्या टेम्पोवर एसटी आदळली
त्र्यंबकेश्वर-पुणे (क्रमांक एमएच 14 बीटी 4351) ही एसटी बस त्र्यंबकेश्वर, नाशिकहून पुण्याकडे निघाली होती. महामार्गावर नारायणगावजवळ कांद्याच्या गोण्यांनी भरलेला टेम्पो टायर पंक्चर झाल्याने ते टायर बदलण्यासाठी थांबला होता. त्याचा चालक आणि क्लीनर हे दोघे खाली उतरून जॅक लावत होते. त्याचवेळ भरधाव येणार्या बसने या टेम्पोला जोरदार धडक बसली. या अपघातात टेम्पोचा चालक आणि क्लीनरसह 9 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला. आठ जण जागीच ठार झाले होते. तर एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या भीषण अपघातात एसटी बसची एक बाजू पूर्णपणे उखडली गेली. रात्री दीड वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. बसमध्ये एकूण 27 प्रवासी होते.
मृतांची नावे :
शोभा नंदू पगार (45 मु. उतराणे, बागलाल, सटाणा), यमुना बिला पगार (55, सटाणा), संकेत दत्तात्रय मिस्त्री (गणेश चौक, सिडको, नाशिक), विकास चंद्रकांत गुजराथी (50 गंगावेश, सिन्नर), सागर कृष्णलाल चौधरी (30), अभिशेख जोशी, कैलाश विठ्ठल वायकर, किशोर यशवंत जोंधळे (40, संगमनेर), जाकीर गुलाब पठाण (30, आयशर टेम्पो चालक)
जखमी : नंदू सीताराम पगार (58), संतोष जयसिंग गुलदगड 32, दीपक चंद्रकांत लांडगे (31), संतु तुळशीराम बावसार (52), तुकाराम जंग्या पावरा (56), सूर्यकांत धोंडीराम घाडगे (57), गणेश एकनाथ घोंगडे (25, भोसरी), रमेश रामदास शेळके (44), ज्ञानेश्वर रमेश शेळके (40), अरुण लक्ष्मण शिंदे (23), सुधीर तील बागवाने (49), तुषार दशरथ करळे (29), प्रवीण गमसेवक दुबे (38)