ब्लॅक सैटरडे : अपघातांत 17 ठार

0

लातूर/शनिशिंगणापूर : अमावश्येचा शनिवारचा दिवस हा राज्याचा ब्लॅक संडे ठरला. तीन ठिकाणी झालेल्या दुर्देवी अपघातात एकूण 17 जण ठार झालेत. लातूर-निलंगा महामार्गावर झालेल्या एसटी बस, ट्रक आणि स्विफ्ट डिझायर कारच्या विचित्र अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, नगर जिल्ह्यातील नगर-मनमाड मार्गावरही टाटा मॅजिक आणि आयशर ट्रक यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन साईभक्त ठार झाले आहेत. हे भक्त शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन करून शनिशिंगणापूरला दर्शनासाठी जात होते. तर दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील सोलापूर-पुणे महामार्गावर भरधाव दुचाकीस्वाराने पती-पत्नीला उडविल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हॉटेलात जेवण करून हे दाम्पत्य घरी पायीच जात होते.

लातूर अपघातातील अनेकांची प्रकृती चिंताजनक
लातूर-निलंगा मार्गावर झालेल्या विचित्र अपघातात 12 प्रवासी ठार तर 30 जण गंभीर जखमी झालेले आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत होती. या जखमींना नजीकच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. मृतांमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे. शनिवारी दुपारी निलंगा आगाराची बस (क्रमांक एमएच 20, डी 9611) लातूरकडे जात असताना तिला भरधाव ट्रकची चलबुर्गा पाटील येथे जोरदार धडक बसली. त्यातच स्विफ्ट डिझायर कारही त्यांच्यावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की, बसचा चक्काचूर झाला होता. अर्धाभाग पूर्णपणे कापला गेला होता. जखमींच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. या जखमी व मृतांना लातूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सहा साईभक्तांची प्रकृतीही चिंताजनक
दुसरीकडे, शिर्डी येथून साई समाधीचे दर्शन करून शनिशिंगणापूरला जाणार्‍या नाशिक जिल्ह्यातील वणी, दिंडोरी व बडोदा येथील भाविकांवर काळाने घाला घातला. या भाविकांची टाटा मॅजिक गाडी नगर-मनमाड मार्गावरील राहुरी येथील हॉटेल जयश्री येथे थांबली होती. त्याचवेळी भरधाव आलेला आयशर ट्रक या गाडीवर आदळला. त्यात दोन भाविक जागीच तर एका भाविकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या भीषण अपघातात सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर राहुरीतील रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिशिंगणापूर येथे अमावश्येनिमित्त मोठी गर्दी असल्याने अवैध वाहतूक जोरात होती. त्याच वाहतुकीपोटी हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात लोणी काळभोर येथील हणुमंत विठ्ठल लोखंडे (वय 45) व सुनिता हणुमंत लोखंडे (वय 42) हे दाम्पत्य ठार झाले आहे. महामार्गावरील हॉटेलमध्ये जेवण करून हे दाम्पत्य पायीच घरी जात होते. त्यांना दुचाकीस्वार आकाश सरणाप्पा नागोरे व त्याचा मित्र गुरुप्रसाद जाणराव यांनी जोराची धडक दिली. या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले तर दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.