ब्ल्यू अँड पिंक : मुख्यमंत्री महोदय बंदी आणणार तरी कसे?

0

सध्या सगळीकडे ‘ब्ल्यू व्हेल’ची दहशत आहे. मुंबईतल्या एका शाळकरी मुलाने या खेळापायी आत्महत्या केल्याचा संशय आहे. या सुसाईड गेमवर बंदी आणण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे प्रयत्न करायचे आश्वासनही दिले आहे. पण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. कारण ह्या ऑनलाईन गेमचे मूळ काय? तो कुणी? कशासाठी? बनवला आहे, यात अजूनही एकवाक्यता नाही. एका रशियन तरुणाला यासंदर्भात आरोपी समजले जात असले तरी, त्याने एकट्याने हे सारे जमवलंय की अजून कोण साथीदार आहेत? खेळातले क्युरेटर्स म्हणजे नक्की कोण? त्यांची संख्या किती? या साऱ्या बाबी अज्ञात आहेत. त्यातच ‘एकदा हा गेम डाउनलोड केला की, अनइन्स्टॉल करता येत नाही’ अशी भीती घातली गेल्याने आपणच प्रयोग करून बघणे सुद्धा कठीणच आहे. भारतापुरता विचार केला तरी, या गेमचा सर्व्हर इथला नसल्याने आपण त्यांचे फारसे काही बिघडवू शकत नाही. तसेही भलतेसलते करायला लावणारा ‘ब्ल्यू व्हेल’ एकटाच नाही. असे अनेक व्हेल, शार्क इंटरनेटच्या अफाट सागरात तत्पर आहेत. एकावर बंदी घाला दुसरा डोकं वर काढणार? अशा स्थितीत तुम्ही कुठे कुठे धावणार? त्यापेक्षा स्वतःच्याच घरात डोकावून पाहिलेलं काय वाईट?

सुसाईडला गेम समजणारी मुलं नक्कीच सामान्य नसतात. विळीने काही चिरताना जरासं बोट कापलं तरी विव्हळणारे, स्वतःच्या हातांवर – ओठांवर रेझरने जखमा करू धजावतात ते काही एका क्युरेटरच्या सांगण्यावरून नाही. शारीरिक वेदना बधिर करणारे मानसिक दु:ख त्यांच्या आत आधीच खोलवर दडलेले असते. आपल्यासाठी कुणी नाही, आपली कुणाला पर्वा नाही असा ठाम विश्वास असतो. बेफिकिरीच्या मुखवट्याआड दडवलेले एकटेपणाचं दु:ख आणि मीडियातून – कॉम्प्युटर गेम मधून सतत होणाऱ्या हिंसाचाराच्या भडीमारामुळे वेदनेविषयी सहवेदना मेलेली असते. सोशल मीडियावर कुणाच्यातरी पडण्या-धडपडण्याचे व्हिडीओ कॉमेडी म्हणून पाठविणाऱ्यांची ही पिढी असते. अजाण वयात जगाचे कुरूप रूप तिन्ही त्रिकाळ नजरेवर – कानावर आदळत गेल्याने, एक नकारात्मक भावना वाढीस लागलेली असते. तसेही मीडिया म्हणा किंवा सोशल मीडिया, जग आहे त्याहून कुरूप दाखविण्यात यांच्यात जणू स्पर्धाच असते. जाती-धर्माच्या अस्मितेवरून सोशल मीडियात जेवढी युद्ध होतात, तेवढी जगाच्या पाठीवर कुठेच होत नसतील. लहानपणी एका डब्यात जेवलेले मित्र, फेसबुकवर अस्पृश्यतेच्या मुद्द्यावरून गुद्द्यावर येतात तेव्हा नेमके कसे व्यक्त कळत नाही. बरं हे व्हर्चुअल भांडण तिथेच सीमित राहिलं असतं तर हरकत नव्हती. पण दुर्दैवाने तसे होत नाही. इथले बहाद्दर पडद्यावरच्या अनोळखी लोकांना एकटेच भेटायचे धाडस करतात, तिथे जाऊन शारीरिक – आर्थिक शोषण ओढवून घेतात, पण घरच्या-शेजारच्या माणसाला टाळतात. आपुलकीच्या नात्यातून विलग झालेली ही मंडळी अलगद ‘ब्ल्यू व्हेल’च्या जाळ्यात अडकली, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

‘ब्ल्यू व्हेल’चं हे मायाजाल तोडण्यासाठी ‘पिंक व्हेल’ नावाचा नवा गेम सज्ज होत आहे. मित्रांबरोबर वेळ घालवणे, बाहेर फिरायला जाणे, कुटुंबाबरोबर एकत्र जेवण करणे, कुणाशी भांडण झाले असल्यास स्वतःहून सॉरी म्हणणे, असे अनेक ‘अवघड’ टास्क हा खेळात आहेत. त्यापेक्षा ‘सुईने स्वतःच्या हातावर व्हेलचे चित्र कोरणे, ओठ कापून घेणे, उंचावरून खाली उडी मारणे’ सहज वाटेल अनेकांना. जिथे पराचा कावळा करून वाद घडविल्याशिवाय रंगत येत नाही, तिथं निर्मळ मैत्रीची थेरं सांगितलीत कुणी? माणूस निसर्गतः सामाजिक प्राणी असला तरी तो आता इतिहास आहे. जग जवळ आणण्याच्या नादात, आपण एकमेकांपासून खरंच खूप दूर गेलोत. आता पुन्हा जवळ येणे, वाटतं तेवढं सोपं नाही. एक उपचार म्हणून – चॅलेंज म्हणून आपण काही टास्क पूर्ण करूही, पण त्यात सहजता येणं कठीण आहे. म्हणूनच ‘ब्ल्यू’ आणि ‘पिंक’च्या भांडणात सध्यातरी ‘ब्ल्यू’चं वरचढ ठरणार आहे. आपल्याच आत डोकावून पाहायला शिकविणारा, स्वतःच्या सुख-दुःखाची जबाबदारी घ्यायला शिकविणारा ‘गुगल मॅप’ तयार होईपर्यंत तरी जरा अवघडच जाणार आहे.

– सृष्टी गुजराथी,
मुक्त पत्रकार, लेखिका
खारघर, मुंबई
9867298771