पुणे । ‘ब्ल्यू व्हेल’ मोबाइल गेमने मुंबईत एका मुलाचा बळी घेतल्याची घटना ताजी असताना हाच गेम खेळणार्या 14 वर्षीय मुलाला पोलिसांनी भिगवण बसस्थानकावर ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. सुधीर भोससे (रा. सोलापूर) त्याचे नाव आहे. तो मागील पाच दिवसांपासून गेम खेळत होता व सोलापूरातून बुधवारी पुण्यात पोहोचला होता.
सोलापूर-पुणे महामार्गावर सकाळी पोलिस पेट्रोलिंग करत असताना सुधीर हा सोलापूरहून पुण्याकडे निघाल्याची माहिती सोलापूर पोलिसांकडून मिळाली. विशेष म्हणजे तो मागील पाच दिवसांपासून ’ब्ल्यू व्हेल’ गेम खेळत होता. पोलिसांनी भिगवण बस स्थानकावर बसमधून त्याला ताब्यात घेवून त्याच्या नातेवाईकांना कळविले. सुधीर 4-5 दिवसांपासून शाळेत गेला नव्हता. तो बुधवारी पहाटे घराबाहेर पडला. तो सोलापूर-पुणे बसमध्ये बसला. तो कुठे जातोय हे देखील त्याने आई-वडिलांना सांगितले नव्हते. दरम्यान, ब्ल्यू व्हेल शेवटची लेव्हल पूर्ण करण्यासाठी मुंबईत 14 वर्षीय मनप्रीत नामक विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. आता हे लोण सर्वत्र पोहचले की, काय? अशी भिती व्यक्त होत आहे.
Prev Post