नवी दिल्ली । हल्ली मोबाइल हे फक्त संवाद साधण्याचे साधन राहिले नसून आता त्यावर वेगवेगळे गेम खेळले जातात. स्मार्टफोनवरील गेम खेळणे हे कायमच जीवघेणे असल्याचं समोर आले आहे. मात्र, आता हाती आलेल्या माहितीनुसार तब्बल 130 मुलांनी एका गेममुळे आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे आणि हा जीवघेणा गेम आहे ‘ब्ल्यू व्हेल’. या गेममुळे रशियातील 130 मुलांनी आत्महत्या केली आहे. मात्र, पोलीस याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करत नाहीत.
काय आहे ‘ब्ल्यू व्हेल’?
काही वेबसाइट्सने दिलेल्या माहितीनुसार, या खेळात प्लेअर्सला 50 वेगवेगळी आव्हाने दिली जातात. म्हणजे एखादा हॉरर मूव्ही बघणे किंवा स्वत:ला जखमी करून घेणे वगैरे आणि प्रत्येक आव्हान पूर्ण झालं की त्याचा पुरावा प्लेअर्सला द्यावा लागतो. या खेळाचा शेवटचा टप्पा असतो आत्महत्या करण्याचा. जर प्लेअर्सने ते आव्हान पूर्ण केले नाही तर त्यांना धमकीचे मेसेजही येतात, असेही इंग्लंडमधल्या अनेक वेबसाइट्सने म्हटले आहे. ‘खलिज टाइम्स’च्या वृत्तानुसार, आता सोशल मीडिया साइटवर अलर्ट मेसेजेसही फिरत आहेत. पालकांनी आपली मुलं कोणता गेम खेळत आहे यावर लक्ष ठेवावे अन्यथा त्यांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. तेव्हा ‘ब्ल्यू व्हेल’ या खेळाने पालकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली आहे.
कसा खेळला जातो हा ‘ब्ल्यू व्हेल गेम’?
हा गेम खेळायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला एक ‘मास्टर’ मिळतो. हाच मास्टर तुम्हाला म्हणजचे यूझर्सला पुढचे 50 दिवस कंट्रोल करतो. तो युझरला दररोज एक टास्क देतो. यातील अनेक टास्क असे असतात की, ज्यामध्ये युझरला स्वत:च्या शरीराला त्रास द्यायचा असतो. स्वत:च्या रक्ताने ब्ल्यू व्हेल तयार करणे, दिवस-दिवसभर हॉरर सिनेमा पाहणे आणि रात्रभर जागणे. यांसारखे विचित्र टास्क पूर्ण करत असताना अनेक मुले नैराश्याच्या गर्तेत जातात. या खेळात 50व्या दिवशी खेळणार्या युझरला जीव देऊन विजेते व्हाल असे सांगितले जाते. अनेक शाळांमधून आता पालकांना या जीवघेण्या गेमबाबत माहिती दिली जात असून, आपल्या मुलांना त्यापासून दूर ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.